हिंमत असेल तर जनतेच्या न्यायालयात या: सुभाष देसाई

रत्नागिरी:- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना, ज्यांना भरभरून दिले. त्यांनीच गद्दारी केली. केवळ पक्ष सोडला नाही. तर ज्या पक्षाने वाढवलं, मोठं केल. तो पक्षच गिलंकृत केला आहे. चिन्ह घेतलं, पक्षाचे नाव घेतले. ठाकरे अडनाव घेवू शकता का? असे सांगत आता शिवसैनिक पेटून उठला आहे. आता हिमंत असेल तर निवडणूक घेवून जनतेच्या न्यायालयात या! पाठित खंजिर खूपसल्याचा सूड शिवसैनिक घेवून गद्दारांना जनताच घरी पाठवेल असा इशारा शिवसेना नेते तथा माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिला.

राज्याचे उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांच्या विधानसभा मतदार संघात मंगळवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने शक्ती प्रदर्शन करत शिवगर्जना अभियानाची सुुुरुवात केली. यावेळी स्वयंवर मंगल कार्यालय शिवसैनिकांच्या गर्दीने खचाखच भरले होते. अनेक शिवसैनिक कार्यालयाबाहेर उभे असल्याचे चित्र दिसत होते.तर जेष्ठ शिवसैनिकांसह युवा सैनिकांसह महिलांचा समावेश जास्त होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना श्री.देसाई बोलत होते.

यावेळी  शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळी, मुंबईच्या माजी नगरसेविका सौ.विश्वासराव, समन्वयक श्री.बोरकर, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुका प्रमुख प्रदिप ऊर्फ बंड्या साळवी, विधानसभा संपर्क प्रमुख प्रमोद शेरे, युवासेना तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत, महिला तालुका संघटक साक्षी रावणंग, माजी जि.प. अध्यक्षा रचना महाडिक, महिला जिल्हा प्रमुख वेदा फडके, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून ज्यांना सत्तेची पदे दिली. मोठे केले त्यांनीच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, असा खोटेपणा करणार्‍यांना आता मतदानाच्या माध्यमातूनच उत्तर देण्याची वेळ आली आहे. शिवसेनिकांनी शांत न राहता पेटून उठले पाहिजे. ४० गद्दाराना धडा शिकवल्याशिवाय सर्वसामान्य जनता व शिवसैनिक शांत बसणार नाही. हिंमत असेल तर मैदानात या,जनता तुम्हाला निश्चितपणे घरी पाठवेल असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून श्री.उद्धव ठाकरे हे जनतेचा जीव वाचविण्यासाठी धडपड करत होते. याच कालावधीत भारतीय जनता पार्टीची काही लोक शिवसेनेतील गद्दारांना सोबत घेऊन सत्ता काबीज करण्याचे षडयंत्र रचत होते. यामध्ये त्यांना यशही आले. ते केवळ या ४० गद्दारांमुळेच. गद्दार जाताना पक्षासह पक्षाचे चिन्ह ही घेऊन गेले, परंतु माझा बहाद्दर शिवसैनिक यापुढेही लढत राहील. जनतेच्या न्यायालयात लढून पुन्हा शिवसेनेचा भगवा विधानसभेवर डौलाने फडकेल असे श्री. देसाई यांनी सांगितले.

निवडणूक आयोग ही स्वायत्त यंत्रणा आहे. परंतु आता ती स्वायत्त यंत्रणा होती अशी म्हणण्याची वेळ आली आहे. सुरुवातीला निवडणूक आयोगाने तुमची राज्यातील पक्षाची ताकद किती आहे. हे कागदोपत्री दाखवण्याची सूचना केली. आम्ही प्रतिज्ञापत्र दिली, परंतु निकाल देताना त्या प्रतिज्ञा पत्रांच्या गट्ट्याकडे पाहिलेही नाही. केवळ सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील आमदारांच्या मतांची बेरीज करून चुकीच्या पद्धतीने निवडणूक आयोगाने निर्णय दिला.हा  निर्णय भाजपच्या सांगण्यावरूनच देण्यात आला असा आरोप श्री.देसाई यांनी केला.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत हेही मिंदे गटात सहभागी झाले. परंतु येथील सर्वसामान्य शिवसैनिक जराही हलला नाही. आजही तो शिवसेने सोबत आहे. हे समोरील गर्दीवरून स्पष्ट होत आहे. आज दोन मतपेट्या ठेवल्या व ना.सामंत यांनी घेतलेल्या निर्णयाचा पोल मागितला तर ९० टक्के जनमत सामंतांच्या निर्णयाला विरोध करतील अशी स्थिती या मतदारसंघात आहे. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा भगवा फडकेल असा विश्वास श्री.देसाई यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर जगावर आलेले कोरोना संकट महाराष्ट्रातही आले. परंतु मुख्यमंत्री डगमगले नाहीत ते खंबीरपणे कोरोना महामारीला सामोरे गेले. त्यांनी आपल्या जनतेचे प्राण वाचवले, तर या कालावधीत आमच्यासारखे मंत्र्यांनी ही सहा लाख कोटींची गुंतवणूक त्या कालावधीत महाराष्ट्रात आणली. त्यातून आज हजारो तरुणांना नोकर्‍या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकर या कंपन्या सुरू होणार आहेत. सत्तेच्या लोभापोटी गेलेले ४० जण अल्पबुद्धी असल्याचा आरोप श्री. देसाई यांनी केला. आपण केलेली गद्दारीचे भविष्य काय आहे ? ते या गद्दारांना लवकरच कळेल. भाजपने यांना सत्तेसाठी वापरून घेतले आहे. नंतर भाजप त्यांना सोडून देईल. आज देशभरात जवळजवळ ३६ पक्षांनी भाजपला दूर केले आहे. त्यामुळे मिंदे गटालाही भाजप एक दिवशी बाजूला करेल असा टोला श्री. देसाई यांनी लगावला. हिम्मत असेल तर आत्ता विधानसभा निवडणूक घ्या एकूण आमदारांपैकी ७० टक्के आमदार महाविकास आघाडीचे निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत पाठीत खंजीर खुपसला त्यांचा सुड शिवसैनिकच घेतील, गद्दारांना महाराष्ट्रातील जनता घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास श्री.देसाई यांनी व्यक्त केला.

शिवसेना उपनेते मीना कांबळी यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली. शिवसेना संपवण्याची हिंमत कोणामध्ये नाही. शिंदे गटाच्या ५६ पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. पक्ष घ्या, चिन्ह घ्या, परंतु ठाकरे आडनाव घेणार कसे? जोपर्यंत राज्यात ठाकरे आडनाव आहे. तोपर्यंत शिवसेनेला संपवण्याची ताकद कोणामध्ये नाही. फिनिक्स पक्षाप्रमाणे उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा भरारी घेईल व उद्धव ठाकरे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यापूर्वी सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके,  तालुकाप्रमुख बंड्या साळवी,  विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आता उठा जागे व्हा! संघर्षाची तयारी ठेवा! असा संदेश दिला.