हवामानातील बदलाचा कोकण कृषी विद्यापीठ करणार अभ्यास

रत्नागिरी:- गेले दोन दिवस थंडी वाढल्याने आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला आहे; मात्र यंदा सुरवातीपासून वातावरणात सातत्याने चढ-उतार निर्माण झाले आहे. त्याचा आंबा पिकावर परिणाम होत असून त्यावर उपाययोजना करताना बागायतदारांची त्रेधातिरपिट उडते. यासाठी कोकण कृषी विद्यापिठाने पुढाकार घेतला आहे. प्राथमिकस्तरावर दापोलीतील चार ठिकाणी हवामानातील चढ-उतारांची निरीक्षणे नोंदवून त्याचे होणारे परिणाम यावर अभ्यास सुरु आहे.

यंदाचा हापूस हंगाम हवामानातील चढ-उतारामुळे अंधातरीच आहे. मोहोर येण्याची प्रक्रिया सुरु झाली तरी थंडीचा जोर नाही. त्यामुळे मोहोराचे प्रमाण किती राहील, त्याला फळधारणा किती होईल हे सांगणे तज्ज्ञांनाही शक्य होत नाही. पुढील आठवडाभरातील परिस्थितीवर हंगामाचे चित्र स्पष्ट होणार आहे. गेले दोन दिवस थंडीला सुरवात झाल्याने बागायतदारांना दिलासा मिळाला. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या तिन टप्प्यात मोहोर येतो. यंदा पहिल्या टप्प्यातील मोहोर अत्यंत कमी आहे. जानेवारीतील मोहोराला आता सुरवात झाली आहे, ही दिलासादायक गोष्ट आहे. कलमांची योग्य मशागत, कोकण कृषी विद्यापिठाकडून दिलेल्या शिफारसींचे योग्य पध्दतीने पालन यावर झाडातून येणारी फूट अवलंबून आहे.

वातावरणातील बदलांच्या नोंदी 2005 पासून वेगवेगळ्या आहेत. शास्त्रीय दृष्ट्या त्याला हवामानातील चढ-उतार म्हणतात. कधी पाऊस पडतो, तर कधी उष्मा, थंडीचा जोर कमी-अधिक अशी स्थिती दिसते. या चढ-उतारांचा आंबा लागवडीवर होणार परिणाम अभ्यासण्याची अत्यंत गरज आहे. जेणेकरुन ही परिस्थिती निर्माण झाल्या आंबा उत्पादनावरील परिणाम कमी होण्यासाठी उपाययोजना सुचवता येणार आहेत. यासाठी कोकण कृषी विद्यापिठाकडून पावले उचलण्यात आली आहेत; प्राथमिकस्तरावर दापोली तालुक्यातील चार ठिकाणांची निवड करुन तेथे हवामानाच्या नोंदी, आंबा बागांवरील निरीक्षणे नोंदवण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात व्यापक पध्दतीने ही निरीक्षणे नोंदवण्यासाठी निधीची गरज भासणार आहे. त्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून निधी मागणी करण्यात आली आहे. तसे झाले तर जिल्ह्यात पंधरा ते वीस ठिकाणी अशी व्यवस्था केली जाणार आहे.