हर्णे:- मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमाराचा खडपात जाताना समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हर्णे बंदरामध्ये मच्छिमाराचा दुर्घटनेतून मृत्यू ही तिसरी घटना असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मधुकर बामा पाटील ( वय -४० ) हे कोणत्याही मासेमारी नौकेवर कायमस्वरूपी खलाशी म्हणून नव्हते तर ज्या नौकेवर खलाश्याची गरज भासेल अश्या नौकेवर जात असत. एका नौकेवरून आले आणि दुसऱ्या नौकेवर मासेमासाठी जाणार होते. त्यासाठी सकाळी घरी जाऊन आंघोळ करून पत्नीला मी दुसऱ्या नौकेवर मासेमारीकरिता जात आहे असे सांगून निघाले. ते हर्णे बाजारातून वस्तू खरेदी करून बंदराच्या दिशेने जात होते. तेवढ्यात शौचास जाण्यासाठी म्हणून ते हर्णे किनारपट्टीलगत असणाऱ्या चांभार खडपात गेले. तिथे जात असतानाच त्यांचा पाय घसरून किनारपट्टीलगतच समुद्राच्या पाण्यात पडले आणि तिथेच त्यांचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती हर्णे पोलिसांनी दिली आहे.
या घटनेची तक्रार कृष्णा चोगले यांनी दिली. पाटील यांचा मृतदेह बराचवेळ खडपात होता . तो पोलिस पाटील प्रकाश वागजे यांनी हजर होऊन स्थानिकांच्या मदतीने किनाऱ्यावर आणला. घटनेचा पंचनामा हर्णे पोलिसांकडून करण्यात आला आहे.