रत्नागिरी:- केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन योजनेची 26 जानेवारीला होणार्या ग्रामसभेत जनजागृती करण्यात येणार आहे. ग्रामसभेत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी सरपंच, पदाधिकारी यांच्यासह महिला मंडळ व तरुण मंडळ यांनी पुढाकार घेऊन ‘माझा परिसर माझी जबाबदारी’ या विशेष अभियानाची जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले आहे.
देशातील सर्व ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) संपूर्ण देशात राबविण्यास चालू केले आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 18 एप्रिल 2018 रोजी संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र राज्य पायाभूत सर्वेक्षणानुसार हागणदारीमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधकामाकरिता अनुदान देणे, 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून मर्यादीत स्वरुपात नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करणे, गावात आवश्यक सार्वजनिक शौचालय बांधकामे करणे व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून त्यांची देखभाल दुरुस्ती करणे, गावातील सांडपाणी व घनकचर्याचे योग्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने वैयक्तिक व सार्वजनिकस्तरावर शोष खड्डे तसेच ओला, सुका व प्लॅस्टीक कचर्याचे अलगीकरण करुन त्याचे व्यवस्थापन करणे इत्यादी, सर्व घटकांच्या उद्दिष्टांची पूर्तता होण्यासाठी व गावातील स्वच्छतेचे सातत्य टिकविण्यासाठी सर्व मिळून सदैव प्रयत्नशील राहण्यासाठी मार्गदर्शन करावयाचे आहे. गावांना हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित होण्यासाठी विहीत कालावधीत सर्व नियोजित कामे पूर्ण करण्याचा संकल्प यावेळी करावयाचा आहे. याकरिता शासनाने स्वच्छ भारत अभियानातून व 15 व्या वित्त आयोगातून बंधित निधी सर्व ग्रामपंचायतींना उपलब्ध करुन दिला आहे.