स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल दोन महिन्यात वाजणार

रत्नागिरी:- राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका सप्टेंबर अथवा ऑक्टोबर महिन्यात किंवा दिवाळीच्या आसपास होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसे सूतोवाच राज्य निवडणूक आयोगाने केले. त्यासाठी 1 जुलैची मतदारयादी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे राज्य शासनाचे राजपत्रच प्रसिद्ध झाले. यामुळे निवडणुका लवकरच होणार अशी चर्चा सुरू आहे.

कोरोनाचा प्रादुर्भा, ओबीसी आरक्षण आणि त्यानंतर राज्यातील सत्तासंघर्ष या कारणांनी राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. सध्या नगर परिषद, जिल्हा परिषदेसारख्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांकडे आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनेकजण गेल्या कित्येक दिवसांपासून देव पाण्यात ठेेवून बसले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील, असे संकेत दिले होते. ते मुंबई-पुणे महापालिकांबाबत हे म्हटले असतील; पण राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसला सहभागी करून घेतल्यानंतर या सर्व घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकांसाठी 1 जुलै 2023 रोजीची विधानसभा मतदारयादी ग्राह्य धरली जाणार असल्याचे राजपत्र राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी प्रसिद्ध केले आहे. यामुळे या निवडणुका आता ऑक्टोबरपर्यंत होतील, असे मानले जाऊ लागले आहे. लवकरच या मतदारयाद्यांनुसार मतदारसंघ तसेच प्रभागनिहाय याद्या तयार करणे, मतदारसंघ, प्रभागरचना ही कामे सुरू होणार असल्याचे समजते.