सेनेच्या आजच्या मेळाव्यापूर्वीच पदाधिकारी बदलाचे वारे

रत्नागिरी:- राज्यातील बदललेल्या राजकिय घडामोडींनतर आता शिवसेनेने पक्षाअंतर्गत बदलला सुरुवात केली आहे. बंडखोर आमदरांचे समर्थक असलेल्या पदाधिकार्‍यांची उलबांगडी करण्यात आली आहे. तर त्या जागी नव्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी तालुका युवा अधिकारी पदी मिरजोळे येथील वैभव पाटील यांची तर उपजिल्हा युवा अधिकारी म्हणूण पावस येथील हेमंत खातू यांची नियुक्ती केल्याचे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून जाहिर करण्यात आले आहे.

शिवसेनेतील सुमारे चाळीस आमदारांनी बंड करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यानंतर भाजपच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन करण्यात आली. बंडखोर आमदारांमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांचाही समावेश आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आ.सामंत समर्थक पदाधिकार्‍यांची उचलबांगडी करण्याला सुरुवात करण्यात आली आहे.
तालुका युवा अधिकारी तुषार साळवी यांच्या जागी वैभव पाटील यांची तर केतन शेट्ये यांच्या जागी हेमंत खातू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या पदाधिकार्‍यांचे जिल्हा सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुका प्रमुख बंड्या साळवी, विधानसभा श्रेत्र संघटक प्रमोद शेरे यांनी अभिनंदन केले आहे.