पोलिसांचे यश ; १२ महिन्यातील ७ गुन्ह्यांचा शोध
रत्नागिरी:- जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाला सायबर गुन्ह्यांमधील पैसे तक्रारदारांच्या बँक खात्यामध्ये परत मिळवून देण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या मुदतीमध्ये दाखल गुन्ह्यांपैकी एकूण ७ गुन्ह्यांमध्ये एकूण रक्कम १० लाख ८३ हजार ३८७ एवढे पैसे तक्रारदारांच्या बँक खात्यामध्ये परत जमा झाली आहे. सायबर शाखेचे हे मोठे यश आहे.
तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे सायबर गु्न्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. सायबर गुन्हेगारांकडून विविध पद्धतींचा वापर करून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते. पर्यायाने सर्वसामान्य नागरिकांनी घरखरेदी, जमीनखरेदी, मुलांची लग्ने आदी गोष्टींकरीता साठवून ठेवलेल्या पैशांची सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांच्या सायबर अज्ञानाचा फायदा घेऊन आर्थिक फसवणूक करतात. या सर्व गोष्टींचा सखोल आढावा घेऊन वाढत्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा या उद्देशाने जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून सायबर एहसास या नावाने सायबर जनजागृती अभियान जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये राबवण्यात आले. या अभियानाअंतर्गत नागरिकांनी बँक एटीएम कार्डची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, मोबाईलवर येणारे ओटीपी इतरांना किंवा अनोळखी व्यक्तींना शेअर करू नये, फसव्या योजनांच्या अमिषांना बळी पडू नये, आर्थिक व्यवहार होणाऱ्या वेबसाइटवर काम करताना दक्षता घ्यावी, अशा प्रकारचे संदेश देणारे निरनिराळे बॅनर्स, भित्तीपत्रे, हॅंडबिल्स, पॅपलेट्स, स्लाईड शोच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
अधीक्षक गर्ग यांनी दाखल सायबर गुन्ह्यांचा सतत पाठपुरावा करून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी व सर्वसामान्यांच्या सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केलेले पैसे परत मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याबाबत सायबर पोलिस ठाणे तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना आदेश दिले. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२१ या मुदतीमध्ये दाखल गुन्ह्यांपैकी एकूण ७ गुन्ह्यांमध्ये रक्कम रुपये ५ लाख ३६ हजार ३८७ तसेच एकूण ६ अर्जामध्ये ५ लाख ४७ हजार अशी एकूण १० लाख ८३ हजार ३८७ पैसे तक्रारदारांच्या बँक खात्यामध्ये परत मिळवण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे.
गहाळ २० मोबाईल परत मिळाले
गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आला. ऑगस्ट २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत एकूण २० मोबाईल गहाळ झाले होते तर परत मिळवण्यात पोलिसांना यश आले. त्यामध्ये चिपळूण उपविभागातून १३, लांजा उपविभागातून २, राजापूर उपविभागातून ३, खेड उपविभागातून २ मोबाईल परत मिळवण्यात आले. त्यापैकी १५ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना काल प्रजासत्ताक दिनाच्या समारंभामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या हस्ते परत देण्यात आले.