राजापूर:-तालुक्यातील तळगाव कासारवाडी येथे दोन भावात सामाईक जमिनीच्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संजना बेलवलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पती शिवानंद बेलवलकर व दीर गजानन बेलवलकर यांचे सामाईक घर असून एकाच घरामध्ये ते विभक्त राहतात. फिर्यादी घरामध्ये नसताना गजानन बेलवलकर, प्रशांत बेलवलकर या दोघांनी सार्वजनिक गणपतीचे साहित्य घराबाहेर फेकून दिले. याचे कारण बेलवलकर यांनी विचारत ‘जसं सामान बाहेर फेकलं तस आतमध्ये आणून ठेवा‘ असं सांगितलं. याचा राग येवून गजानन व प्रशांत यांनी शिवीगाळ करत शिवानंद यांची मान पकडली. पतीला मारहाण होत असताना संजना या सोडवण्यासाठी गेल्या असता गजानन याने हातातील दांडक्याने मारहाण केली. यामध्ये पती-पत्नी जखमी झाले.
संजना यांनी राजापूर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार गजानन बेलवलकर, प्रशांत बेलवलकर यांच्या भादविकलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या बाजूने गजानन बेलवलकर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पूर्वीचा राग मनात धरुन आम्ही साहित्य घराबाहेर टाकले असा गैरसमज करुन घेत गजानन बेलवलकर यांना मारहाण केली. त्यानुसार शिवानंद, संजना बेलवलकर यांच्या विरोधात भादविकलम 324, 323, 504, 506, 352, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.