संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला असून रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राष्ट्रवादीचे नेते सहदेव बेटकर यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या वर विश्वास ठेवून राष्ट्रवादीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत मंगळवारी मुख्यमंत्री निवासस्थानी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
त्यांच्यासह गुहागर, संगमेश्वर, चिपळूण, मंडणगड,दापोली अशा अनेक तालुक्यातील पदाधिकारी व शेकडो समर्थकांनी जाहीर प्रवेश केला.
सहदेव बेटकर हे रत्नागिरीतील कुणबी समाजाचे नेते असून रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचा चांगला संपर्क आहे. याशिवाय सामाजिक कार्याच्या माध्यमातून चांगले काम आहे. त्यांच्या पाठीमागे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील लोक भक्कमपणे उभे आहेत.
गुहागर विधानसभा मतदारसंघात त्यांनी ऐनवेळी भास्कर जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली त्यांना केवळ साडेतीन हजार मतांनी पराभव पत्करावा लागला.
यावेळीही मी गुहागरवासियांच्या संपर्कात असून मी माझी तयारी सुरू ठेवली आहे आणि यावेळेसही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत समोर असणाऱ्या उमेदवाराला धुळ चारणार असल्याचे सहदेव बेटकर यांनी सांगितले. राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी माझ्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहदेव बेटकर यांच्या समावेत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, संगमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती कृष्ण हरेकर, पप्पू सुर्वे, कमलाकर ब्रीद सहित हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर प्रवेश केला.