सलग सुट्ट्यांमुळे गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी 

रत्नागिरी:- उन्हाळी सुट्टीबरोबरच जोडून आलेल्या शासकीय सुट्ट्यामुळे प्रसिद्ध गणपतीपुळे पर्यटन स्थळी प्रचंड गर्दी झाली आहे. किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुन्हा जीवारक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर कोंकणातील पर्यटन स्थळी पर्यटकांचा राबता वाढत आहे. दापोली, गुहागर सह  गणपतीपुळेत  सर्वाधिक गर्दी आहे. चार दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे पर्यटकांच्या मनात धास्ती होती. मात्र वादळ सरल्यामुळे शनिवारी आणि रविवारी पर्यटकांनी फिरायला बाहेर पडणे पसंत केले आहे. त्यामुळे गणपतीपुळेत पर्यटकांची शनिवारी (14) गर्दी होती. काही हॉटेल मध्ये दोन दिवसासाठी रूम फुल्ल झाल्या होत्या. पर्यटक आल्यामुळे व्यवसायिकांना अच्छे दीन आले आहेत. दिवसभरात दहा हजाराहून अधिक पर्यटकांनी गणपती मंदिरात दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे.

पर्यटक वाढल्यामुळं किनारी भागात पोहणाऱ्याना सुरक्षा मिळावी यासाठी जीवारक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. सुमारे नऊ जण कार्यरत असल्याचे समजते. शुक्रवारी (13) कोल्हापूर येथील तिनं पर्यटक पोहताना खोल समुद्रात बुडण्याची शक्यता होती. मोरया स्पोर्ट्स च्या स्पीड बोटीनी त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले. यावेळी जिवरक्षक अनुपस्थित होते. त्यांचा मानधनाचा प्रश्न सुटल्यामुळे शनिवारी ते पुन्हा कार्यरत झाले आहेत. परिणामी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटला.