समुद्राच्या लाटामध्ये रासायनिक प्रक्रियेतून तयार होतो निळा प्रकाश; तज्ज्ञांचे स्पष्टीकरण

रत्नागिरी:- तालुक्‍यातील किनाऱ्यांवर रात्रीच्यावेळी दिसणाऱ्या निळ्याशार लाटा पर्यटकांना भुरळ घालत आहेत. लाटांवर पेटल्यासारखा चमकणारा हा जीव डोळ्यांनी दिसू शकतो; मात्र मायक्रोस्कोपमधून त्याला पाहिले तर त्याची रचना बदामासारखी दिसते. त्यांच्या शरीरात लुसिफेरेन हे प्रथिन आणि लुसिफेरेज हे एंझाईम प्राणवायूच्या सान्निध्यात आल्यानंतर रासायनिक प्रक्रिया होते आणि जी ऊर्जा निर्माण होते, त्यामधून प्लवंगामध्ये प्रकाश दिसू लागतो, असे सागरी जीव अभ्यासक डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी सांगितले.

रत्नागिरी शहरातील भाट्येसह आरे-वारे, रिळ, वरवडे येथील किनाऱ्यांवर रात्री निळ्याशार लाटा पाहायला मिळत आहेत. याबाबत रत्नागिरीतील सचिन देसाई यांनी चार वर्षांपूर्वीपासून पाठपुरावा केला होता. यावर डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी सविस्तर अभ्यास केला. त्यामधून अनेक नवीन माहिती पुढे आली आहे. लाटांवरील तो प्रकाश कसा निर्माण होतो याची माहिती डॉ. मोहिते यांनी सांगितली. Noctiluca scintilans हे शास्त्रीय नाव असलेले हे एकपेशीय डायनोफ्लाजेलेट प्राणी प्लवंग सध्या मोठ्या प्रमाणात रत्नागिरी आणि गोव्याच्या किनाऱ्यांवर दिसून येत आहेत.

2 मिमीपर्यंत व्यास असलेले हे प्राणी नुसत्या डोळ्यांनी दिसू शकतात पण मायक्रोस्कोपमधून त्यांची आगळीवेगळी रचना तेवढीच आकर्षक आहे. काहीसे बदामाचा आकार असलेले हे प्राणी एकपेशीय प्लवंगातील मोठे सजीव आहेत. त्यांच्या शरीरावर जिलेटिनसारखे पारदर्शक आवरण असते. हलके शरीर असल्यामुळे ते पाण्यावर आरामात तरंगू शकतात. प्लवंगाला सुलभ हालचाल करण्यासाठी 2 फ्लाजेला म्हणजे शेपट्या असतात. त्याचा उपयोग सूक्ष्म भक्ष्य पकडण्यासाठीही होतो. त्यांच्या शरीरात लुसिफेरेन हे प्रथिनं आणि लुसिफेरेज हे एंझाईम यांच्यात प्राणवायूच्या सान्निध्यात रासायनिक प्रक्रिया होऊन जी ऊर्जा निर्माण होते ती प्रकाशाच्या स्वरूपात. तोच हा जैविक प्रकाश . हे प्राणी उद्दीपित होतात तेव्हा हा प्रकाश निर्माण होतो. त्यांच्या शरीरात सिंटीलांस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूजक्‍यांमध्ये ही क्रिया घडते. 

या noctiluca ने आपल्या शरीरात पेडिनोमोनज नोकटीलुके या शैवाल वर्गीय सजीवांना आसरा दिला आहे. त्यामुळे ते हिरवे दिसतात. हे सजीव noctiluca साठी प्रकाशसंश्‍लेषण करून अन्ननिर्मिती करतात. मायक्रोस्कोपमधून या प्राण्याचं एक वेगळच जग दिसते, असे डॉ. मोहिते यांनी सांगितले.