समुद्र खवळला; किनाऱ्यावर अजस्र लाटा

रत्नागिरी:- जिल्ह्यात मुसळधार पावसासह किनारपट्टीवर वादळी वारे जोरात वाहत आहेत. त्यामुळे मिऱ्या पंधरामाड किनार्या वर समुद्राच्या उंच लाटा उसळत असून त्याचा तडाखा किनारपट्टीला बसला आहे. पंधरामाड किनारपट्टीवरील बसारा स्टार जहाजालाही त्याचा फटका बसला आहे. लाटांच्या ताडाख्यामुळे जहाजाची दिशा बदलत आहे.

किनारपट्टीसह सर्वत्रच मंगळवारपासून सलग दुसऱ्या दिवशी समुद्राला उधाण आले. सोमवारी दुपारच्या सुमारास समुद्राला उधान आले होते. मंगळवारी सकाळपासून वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे उधाणाच्या लाटांचा जोरही वाढलेला आहे. अजस्त्र लाटा किनारी भागात आदळत आहेत. उधाणाचा सर्वाधिक फटका पुन्हा एकदा मिऱ्या किनारपट्टीला बसला. मिऱ्या किनार्यावर बंधार्याचे काम सुरु असल्यामुळे मानवी वस्तीला धोका कायम आहे.

समुद्र खवळलेला असल्यामुळे किनारी भागात उंच लाटा उसळत आहेत. लाटांचे पाणी बंधाऱ्यावरुन आता येत आहे. पावसाचा जोर वाढत आहेत. त्याचवेळी समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेगही वाढत आहे.लाटांचा तडाखा कायम राहिल्यास बंधाऱ्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.