सततच्या तारखांना कंटाळलेल्या तरुणाने न्यायालयाच्या आवारातच घातला धिंगाणा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा न्यायालयात ‘तारीख पे तारीख ला कंटाळलेल्या एका तरुणाने न्यायालयातच धिंगाणा घातला. समजावून देखील तरुण समजत नसल्याने अखेर त्या तरुणाला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

सविस्तर घटना अशी की, रत्नागिरी कोकण नगर येथील तरुणाला एका खटल्यात साक्षीदार म्हणून तारखेला जावं लागलं होत. मात्र तिथे पुन्हा तारीख मिळाल्याने त्याने गोंधळ घातला. एवढा गोंधळ घातला की कोर्टातील सारा परिसर दणाणून गेला. सारे त्याच्याकडे बघत होते. मात्र तो काही केल्या थांबत नव्हता. सिराज समीर रणदिवे (32, ऱा कोकणनगर, रत्नागिरी) असे या तरूणाचे नाव आह़े.

खटल्याची सुनावणी लांबणीवर पडत असल्याने संतापलेल्या सिराजने न्यायालय परिसरात शुक्रवारी दुपारी 12.30 च्या सुमारास जोरदार आरडाओरडा केला. त्याच्या गोंधलाकडे वकील वर्गासह न्यायालयात आलेले लोक पहात होते. न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. वारंवार समजावून एकत नसल्याने शेवटी कर्मचाऱ्यानी पोलिसांना बोलावून घेतले. शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सिराजला ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणल़े. त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110 व 117 नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल़ी.