संगमेश्वर महामार्गावर बर्निंग टँकरचा थरार; चालकाने उडी मारत वाचवला जीव 

संगमेश्वर:- मुंबई – गोवा महामार्गावरील शिंदे आंबेरी येथे शुक्रवारी दुपारी धावत्या टँकरने अचानक पेट घेतला. या घटनेने महामार्गावर अचानक गोंधळ उडाला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत टँकरमधून बाहेर उडी मारल्याने चालकाचा जीव वाचला. 

 अशोक चव्हाण (परभणी) हा चालक आपल्या ताब्यातील टँकर मुंबई येथून गोव्याच्या दिशेने घेऊन चालला होता. शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मुंबई – गोवा महामार्गावरील शिंदे आंबेरी येथे टँकर आल्यानंतर दर्शनी भागातून अचानक धूर बाहेर येऊ लागला. वाऱ्याच्या वेगाने आगीने आणखी मोठा पेट घेतला.  या आगीत टँकरच्या पुढचा टायर पूर्णतः पेटला. आगीने मोठा पेट घेतल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने लगेचच गाडी बाहेर उडी घेतली. घटनेनंतर महामार्गावरील वाहने मदतीसाठी थांबली होती. 

ग्रामस्थांनी या घेटनेची माहिती संगमेश्वर पोलिसाना देताच संगमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महामार्गावरील पाण्याच्या टँकरला बोलावून घेत टँकर ला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. या कालावधीत महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती.