रत्नागिरी:- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसह वादळसदृश्य हवामानाने मच्छीमारीला ब्रेक लागला होता. या परिस्थितीतून सावरणार्या रत्नागिरी तालुक्यातील मच्छीमारांपुढे जेलीफिशचे संकट आ वासून उभे आहे. गेले आठवडाभर 10 वावापर्यंत मासेमारी करणार्या मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत; मात्र खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणार्या ट्रॉलिंग, पर्ससिननेटद्वारे मासेमारी करणार्यांना सरंगा, बांगडा, सुरमई मिळत आहे.
कोरोनाच्या सावटामध्ये यंदाचा मच्छीमारी हंगाम सुरु झाला. खलाशी नसल्याने बहूतांश मोठ्या मच्छीमारांना नौका समुद्रात ढकलण्यासाठी उशिरापर्यंत प्रतिक्षा करावी लागली. वातावरणातील बदलांचा सामना करत मासेमारी सुरु होती. ऑक्टोबर महिन्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्र खवळला होता. ही परिस्थिती निवळण्यासाठी 15 ते 20 दिवस लागले. किनारी भागात मासेमारी करणार्या रापणीसह छोट्या मच्छीमार अडचणीत आले. या संकटांचा सामना करणार्या मच्छीमारांपुढे सध्या जेलीफिशचे संकट आवासून उभे राहीले आहे. मिर्या, काळबादेवी, गणपतीपुळे, जयगड या भागात मोठ्याप्रमाणात जेलीफिश सापडत आहेत. झुंडीने असलेले जेलीफिश माशांवर तुटून पडतात. त्यांच्या भितीने मासा किनारी भागातून गायब झाला आहे. जेलीफिश जाळी फाडत असल्याने नुकसाने होते. हे टाळण्यासाठी छोटे मच्छीमार बंदरातच उभे होते. बांगडा, म्हाकुळ, पापलेट यासारखी मासळी मिळत नाही.
जेलीफिश दरवर्षी रत्नागिरी किनार्यावर आढळतो. मतलई वारे सुरु झाल्यामुळे तो किनारी भागाकडे येतो. गिलनेटने मासेमारी करणार्यांना जेलीफिशची भिती आहे. त्याचा अंगाला स्पर्श झाला तर प्रचंड खाज सुटते. त्यामुळे मासेमारीला जाणे अनेकांनी टाळले होते. आठ दिवसांपुर्वी म्हाकुळसह 10 ते 15 किलो मासळी जाळ्यात सापडत होती. त्यावरच मच्छीमारांना समाधान मानावे लागत होते. जेलीफिशने यावर पाणी फेरले. गेले दोन दिवस वार्याची दिशा बदलू लागल्याने जेलीफिशचे संकट कमी होईल अशी आशा आहे. ते खोल समुद्रात निघून जातील किंवा किनार्यांवरील खडकाळ भागात आपटून फुटून जातील. हे संकट कमी झाले तरच अर्थकारण सुधारेल अशी आशा मच्छीमार व्यक्त करत आहेत.
दरम्यान, ट्रॉलिंगसह पर्ससिननेटवाल्यांना 12 वावाच्या पुढे खोल समुद्रात बर्यापैकी मासा मिळत आहे. सध्या सरंगा, टायनी कोळंबी, सुरमई, बांगडा चांगल्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे दरही स्थिरावले आहेत. कोळंबी 120 ते 220 रुपये किलो, बांगडा 100 रुपये किलो, सुरमई 350 रुपये किलो तर सरंगा 100 ते 120 रुपये किलोनी विकला जात आहे. त्यामुळे खवय्ये मिरकरवाडा किनार्यावर मासळी खरेदीसाठी सरसावले आहेत.