शॉपिंग ॲपबाबत तक्रार देताना गमावले 82 हजार रुपये; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- ॲप बाबत तक्रार देताना फिर्यादीची सुमारे 82 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची ही घटना शुक्रवार 31 मार्च रोजी सकाळी 10.41 ते 11 वा. कालावधीत आठवडा बाजार येथे घडली आहे.

राहुल कुमार (रा. गुडगाव, दिल्ली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी त्यांनी शीपराँकेट या शॉपिंग ॲप बाबत तक्रार देण्यासाठी राहुल कुमारच्या मोबाईलवर फोन केला होता. त्याने फिर्यादी यांना रस्क डेस्क ॲप डाउनलोड करण्यास सांगून त्यांच्याकडून गुगल पेचा पिन नंबर टाकण्यास सांगितले. तसेच अँड अ नोटमध्ये जाउन झिरो रुपिज ऑप्शनमध्ये जाउन टाईप करण्यास सांगून तीच प्रोसेस तीन वेळा करायला सांगितली. काही वेळाने फिर्यादी यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून 81 हजार 910 रुपये काढल्याचे मेसेज आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरुन राहुल कुमार विरोधात भादंवि कलम 420,माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.