रत्नागिरी:- ‘अल निनो’ च्या प्रभावामुळे रत्नागिरी शहरावर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन रनप प्रशासनाने आज १६ एप्रिलपासून शहरात एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले असून याची तातडीने अमलबजावणी केली जाणार आहे.
शहराच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन चुकले कि पाणीपुरवठ्याची मदार पानवल धरणावर असायची. पानवल धरणातून शहरापर्यंत ग्रॅव्हीटीने येणारे पाणी शहरवासीयांची तहान भागवीत होते. मात्र पानवल धरणाच्या डागडुजीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने आणि येथून येणाऱ्या जलवाहिनीची वेळेत दुरुस्ती न केल्याने आता मात्र पानवल धरणाचा आधार संपलाय आणि त्यात ‘अल निनो’ च्या प्रभावामुळे रत्नागिरी शहरावर पाणी संकट आले आहे.
याबाबत माहिती देण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने माहिती पत्रक जारी केली आहे. यानुसार दक्षिण पॅसिफीक महासागरातील “अल निनो” या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याच्या शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे उष्णतेच्या लाटा येण्याची संभावना असून तीव्र उष्णतेमुळे होणाऱ्या बाष्पीभवनाने शिळ धरणातील पाण्याचा साठा दिवसेंदिवस वेगाने खालावत जाणार आहे. तसेच यावर्षी विलंबाने मान्सूनचे आगमन होण्याची देखील शक्यता आहे. “अलनिनो” च्या प्रभावाच्या धर्तीवर ऑगस्ट २०२३ पर्यंत पुरेल अशा पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शासन स्तरावरून प्राप्त झाल्या आहेत. सद्यस्थितीत धरणात ६ जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. यापुढे पाण्याच्या योग्य नियोजना अभावी भीषण पाणी टंचाई ओढवू शकते. म्हणूनच संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी १६ एप्रिल २०२३ पासून रत्नागिरी शहरातील नागरिकांना एकदिवसआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.