शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून युवा सेनेकडून शैक्षणिक वह्यांचे वाटप

उद्योजक किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ

रत्नागिरी:- शिवसेनेचा 19 जून रोजी वर्धापन दिन आहे. या वर्धापनदिनाचे औचित्य साधून युवा सेना रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरीत शैक्षणिक वह्यांचे वाटप करण्यात येत आहे. याचा शुभारंभ आज सिंधुरत्न समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ उद्योजक किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शहर प्रमुख बिपीन बंदरकर, माजी नगरसेवक विकास पाटील, निमेश नायर, युवा सेना तालुकाप्रमुख तुषार साळवी, युवासेना शहरप्रमुख अभिजित दुडे, युवा सेना विभाग प्रमुख प्रशांत चाळके, आशुतोष तोडणकर, अनिकेत चव्हाण, समद भाटकर, सालिक सारंग, करुणेश इंदुलकर, अभिजित घोडके, सौरभ मलुष्टे, आदी उपस्थित होते.

युवा सेना रत्नागिरीच्या वतीने वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. यावेळी देखील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाबाबत युवा सेना तालुकाप्रमुख तुषार साळवी यांनी सांगितले की, शिवसेनेच्या 19 जून रोजीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत पालकमंत्री उदय सामंत, किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रत्नागिरी तालुक्यात तसेच शहरात शैक्षणिक वह्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. जवळपास 10 हजार वह्यांचे वाटप आम्ही करणार आहोत. याचबरोबर विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देखील तुषार साळवी यांनी यावेळी दिली. तसेच वह्या वाटपाचा हा उपक्रम यापुढेही आम्ही सुरू ठेवणार आहोत, असं तुषार साळवी यांनी यावेळी सांगितले.