शासन आपल्या दारी तरी स्वातंत्र्यदिनी 109 उपोषणे

रत्नागिरी:- सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी शासन अनेक उपक्रम राबवत आहे. शासन आपल्या दारी येऊनही सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नसल्याचे दिसून येत असून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी तालुका, प्रांत, जिल्हाधिकारी कार्यालय असो की कोकण आयुक्तांकडे न्याय मागण्यासाठी म्हणून स्वातंत्र्यदिनी 109 ठिकाणी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. यात खा. विनायक राऊतही वनजमिनी घोटाळा चौकशीसाठी स्वत: उपोषणाला बसणार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक उपोषण रत्नागिरी तालुक्यात होणार आहेत.

नागरिकांना न्याय मिळावा यासाठी शासन अनेक योजना राबवत आहेत. परंतु त्यानंतरही नागरिकांना न्याय मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रशासकीय यंत्रणा यात कमी पडताना दिसत असल्यानेच, नागरिकांना उपोषणाचे हत्यार उपसावे लागत आहे. स्वातं÷त्र्यदिनी उपोषणे होऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून गेले काही दिवस प्रयत्न सुरु आहेत. परंतु नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात फारसे यश आलेले दिसत नाही.
जिल्ह्यातील तब्बल 109 जणांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सर्वाधिक 41 उपोषणे रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य ठिकाणी होणार आहेत. त्या खालोखाल 18 उपोषणकर्त्यांनी कोणत्या भागात उपोषणे करणार याची नोंद केलेली नाही. दापोलीमध्ये 14, देवरुख 9, चिपळूण 8, खेड 6, गुहागर 3, मंडणगड 4, लांजा 1, राजापूर 2, कोकण आयुक्त कार्यालय 2 तर उद्योग संचालक कोकण विभाग ठाणे याठिकाणी जिल्ह्यातील एक व्यक्ती उपोषण करणार आहे.

संगमेश्वरमधील वन जमीन घोटाळ्याबाबत मागील सहा महिन्यापासून योग्य चौकशीची मागणी खा. विनायक राऊत यांनी केली होती. परंतु या चौकशीकडेही प्रशासनाने कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनीही उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांसारख्या व्यक्तीच्या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असेल तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न पुढे आला आहे.