शाळा सेफ्टीसाठी सादील मधून 1 कोटी 60 लाख

रत्नागिरी:- कोरोना काळात अनेक शाळांमध्ये बाधित रुग्ण वास्तव्यास होते. शाळा सुरू होत असून जिल्हा परिषदेच्या शाळांना स्वच्छतेसह विद्यार्थ्यांच्या काळजीसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सादील निधीतून 1 कोटी 60 लाख 65 हजार रुपये प्राप्त झाले आहेत. त्याचे प्रत्येक तालुक्यातील शाळांना वितरण केले जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या 2 हजार 572 शाळा आहेत. मार्च महिन्यात कोरोनामुळे टाळेबंदीत शैक्षणिक सत्रावर परिणाम झाला. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. आठ महिने घरी राहिल्यामुळे शाळात येणार्‍या विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागातील टक्का वाढला आहे. शाळा सुरु करण्यापुर्वी स्वच्छता करणे, शाळाची साफसफाई करणे, रंगकाम करणे, विद्यार्थ्यांची नियमित तपासणी करणे, हॅण्डवॉश, सॅनिटायझर यासह अन्य वस्तूंची खरेदी करणे याची जबाबदारी शाळांवर टाकण्यात आली होती. राज्य शासनाकडून दरवर्षी जिल्हा परिषदेला 4 टक्के सादील निधी दिला जातो. यामधून विजबिलांसह साहित्य खरेदी केली जाते. यंदा शासनाने कोरोनातील सुविधांवर हा निधी खर्च करावा अशा सुचना दिल्या आहेत. त्यासाठी सर्व जिल्ह्यांना निधी वितरीत केला आहे. शिक्षकांच्या संख्येनिहाय निधी दिला जातो. एका शिक्षकाला सर्वसाधारणपणे दोन हजार रुपये मंजूर आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक कोटी 60 लाख 65 हजार रुपये मंजूर झाला आहेत. मोठ्या पटाच्या शाळांमध्ये अडचणी निर्माण होत असून तिथे स्वच्छता आणि कोरोनाचे नियोजन करता येत नव्हते. त्यांना सादील निधीचा आधार मिळणार आहे.