शहरातील समस्यांवरून सत्ताधारी सेनेची कोंडी

रनप सभा; भाजप नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा 

रत्नागिरी : भाजपच्या नगरसेवकांनी गुरूवारची सर्वसाधारण सभा नव्यानेच बांधण्यात आलेले अनधिकृत गाळे, रखडलेली पाणी योजना आणि मोकाट गुरांच्या मुद्द्यांवरून दणाणून सोडली. हे मुद्दे विषय पत्रिकेव्यतिरिक्त होते. त्याचवेळी विषय पत्रिकेवरील विषय मात्र खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर झाले.

रत्नागिरी शहरातील मारूतीमंदिर येथील छ. शिवाजी स्टेडियमजवळ पाच गाळे अनधिकृतपणे रात्रीच्या रात्रीच आणून बसवण्यात आले. यासंदर्भात नगर परिषद काय कारवाई करणार? असा मुद्दा भाजप नगरसेवकांचे गटनेते समीर तिवरेकर आणि नगरसेवक सुशांत उर्फ मुन्ना चवंडे यांनी विचारला. यावर नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी स्थानिक नगरसेवकांकडून या गाळ्यांबाबतची माहिती घेऊन पुढील कार्यवाही होईल, असे सांगितले.

नगरसेविका सुप्रिया रसाळ, मानसी करमरकर, प्रणाली रायकर यांनी 69 कोटी रूपये खर्चाच्या नळपाणी योजनेचे काम धिम्या गतीने होत असल्याकडे नगराध्यक्षांचे लक्ष वेधले. 3 वर्षे होऊन गेली तरी अद्याप 33 टक्केच काम झाले आहे. शहराच्या खालच्या भागात या योजनेतील कुठलेही काम सुरू नाही. हा येथील रहिवाशांवर अन्याय करण्यासारखा प्रकार असल्याचे या तिन्ही नगरसेविकांनी सांगितले. यावर नगराध्यक्षांनी 31 मार्चपर्यंत या योजनेचे काम पूर्ण होईल. संपूर्ण शहरवासियांनी आपल्याला निवडून दिले आहे त्यामुळे कोणावरही अन्याय करण्याचा प्रश्नच नसल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. या विषयासाठी नगरसेविकांना भाजपच्या नगरसेवकांचीही आक्रमक साथ मिळाली.

नगरसेवक राजू तोडणकर आणि मुन्ना चवंडे यांनी निदर्शनास आणून दिले की, शहरात महावितरण वीजवाहिनी टाकण्यासाठी खोदाई करत आहे. ही खोदाई महावितरणकडून रनपकडून कोणतीही लाईनआऊट न घेता टाकली जात आहे. त्यामुळे शहरवासियांच्या नळजोडण्या तुटत आहेत असे सांगून महावितरणच्या या मनमानीला चाप लावण्याचा आग्रह धरला.

भाजपच्या सर्व नगरसेवकांनी शहरातील मोकाट गुरांचा प्रश्नही उपस्थित केला. यावर मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी गुरे पकडली जाणार असल्याचे सांगितले. पकडलेल्या गुरांना ठेवण्यासाठी रनपच्या मालकीच्या इमारतीची डागडुजी करण्याबाबतचा विषयही सभेसमोर असल्याचे सांगितले. सभेसमोरील इतर विषय सर्वांच्या सहमतीने चर्चा होऊन मंजूर झाले. सभेत झालेल्या या विषयासंदर्भातील माहिती भाजपच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊनही सांगितली.