व्हिसेरा तपासणीनंतरच संदीप फटकारेच्या मृत्यूचे कारण होणार स्पष्ट

रत्नागिरी:- उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर मृत्यू झालेल्या चांदोर येथील संदीप नारायण फटकारे यांच्या शरीरांच्या सर्व भागांचे काही अवशेष (व्हिसेरा) तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत; परंतु त्याचा अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांनी सांगितले.

अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यू कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे. पूर्णगड सागरी पोलिसांकडून संबंधिताचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण स्पष्ट होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. याबाबत पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या वतीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. यातील मृत संदीप चांदोर, खानवली फाटा या ठिकाणी त्याचे वडापावच्या गाडीमध्ये पडलेला होता. त्याच्यावर पावस येथील खासगी डॉक्टरांकडे औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले; परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत जाहीर केले. फटकारे यांना यापूर्वी चक्कर येण्याचा प्रकार झाला होता. तसा प्रकार घडला असेल असे समजून नातेवाइकांनी त्याला घरी नेले. त्यानंतर संदीपला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. त्याच्यावर उपचार सुरू असताना तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले असते तर त्यावर उपचार होऊ शकले असते, अशी चर्चा सुरू होती. तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरामध्ये अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत; परंतु वैद्यकीय अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे रत्नदीप साळोखे यांनी सांगितले.