वेश्या व्यवसाय प्रकरणातील फरार आरोपीला तीन वर्षांनी बेड्या

चिपळूण:- अनैतिक व्यापार आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पसार असलेल्या संशयिताला तब्बल तीन वर्षांनंतर चिपळूण पोलिसांनी मुंबईतून अटक केले आहे.

चिपळूणमधील काहींनी डिसेंबर २०२२ मध्ये नोकरीचे आमिष दाखवून पश्चिम बंगालमधून तरुणींना खेर्डी परिसरात आणून त्यांना अनैतिक व्यापार करण्यास भाग पाडले होते. यामध्ये एक अल्पवयीन पीडिता असल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. तेव्हा संशयितांची जणू रांगच लागली.

त्या तरुणींना येथे आणणारा मोहमद वसिम शेख याला प्रथम अटक करून पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार तसेच अत्याचार करण्यास सहकार्य करणे या गुन्ह्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.

यातील संशयित अकिल इब्राहिम अरकाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र तो त्याचवेळी पसार झाला. अरकाटे याने अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र त्याला जामीन मिळाला नाही. तो मागील तीन वर्ष पसार होता. चिपळूण पोलीसांनी त्याला अखेर मुंबईतून ताब्यात घेवून अटक केली आहे.