रत्नागिरी:- जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. केवळ मेडिकल इमर्जन्सीसाठीच लोकांना घराबाहेर पडता येणार आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची गाडी जप्त केली जाणार आहे. तसेच त्याच ठिकाणी त्यांची कोरोना चाचणी करून पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास त्यांना क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. गुरूवारी सकाळी शहरातील मारूती मंदिर परिसरात बॅरिकेटस् लावून पोलिसांनी सर्वांची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. तर अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांची ॲन्टीजेन चाचणी करण्यात येत होती.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसान जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करून तपासणी करण्यात येत आहे. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे बुधवारी रात्रीपासूनच पोलिसांनी बॅरिकेटस लावून तपासणी सुरू केली आहे. तर गुरूवारी सकाळी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत होती. पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांच्यासह पोलीस कर्मचारी, होमगार्ड, पोलीस मित्र यांनी सकाळपासूनच प्रत्येकाची तपासणी करण्यास सुरूवात केली होती.
रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करून तो कोठे चालला आहे, ओळखपत्र आहे का, याची माहिती घेण्यात आली. त्याचबरोबर अनावश्यक फिरणाऱ्या प्रत्येकाची ॲन्टीजेन तपासणी करण्यात येत होती. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांनाही ॲन्टीजेन तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे मारूती मंदिर परिसरात चाचणीसाठी नागरिकांची रांग लागली होती.