ग्रामीण भागात ५८ कोटी ; केंद्राच्या योजनेतून बुस्टर
रत्नागिरी:- केंद्राच्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून जिल्ह्यात ग्रामीण भागातील विद्युत यंत्रणेच्या बळकटीकरणाची ५८ कोटी ७९ लाखाची कामे करण्यात आली आहेत तर केंद्राच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून शहरी भागातील विद्युत जाळे सक्षमीकरण व विस्तारित करण्याची ३६ कोटी ४९ लाखाची कामे जिल्ह्यात करण्यात आल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली.
केंद्राच्या या योजनेतून ५८ कोटी ७९ लाखाची कामे करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने ३३/११ केव्ही ओणी व साडवली ही दोन उपकेंद्रे उभारली. ३३/ ११ केव्ही लोटे उपकेंद्रात १० एमव्हीए क्षमतेचे एक अतिरिक्त रोहित्र बसवण्यात आले आहे. उच्च दाब ५८ किमी वीजवाहिनी, ११४ किमी लघुदाब वाहिनी, ११३ नवीन वितरण रोहित्रे इत्यादी कामे करण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील १ हजार ५४० दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना वीजजोडणी दिली आहे.
शहरी भागातील विद्युत जाळे सक्षमीकरण व विस्तारित करण्यासाठी केंद्राच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून ३६ कोटी ४९ लाखाची जिल्ह्यात कामे झाली. यामधून ३३/११ केव्ही राजापूर उपकेंद्रातील ५ एमव्हीए क्षमतेच्या रोहित्राची १० एमव्हीए क्षमतावाढ करण्यात आली. त्याचा जवळपास ३९ गावांना लाभ झाला. ३३/११ के. व्ही. झाडगाव ( रत्नागिरी) उपकेंद्रामध्ये नवीन अतिरिक्त ५ एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसवल्याने रत्नागिरी शहराचा वीजपुरवठा सक्षम झाला आहे. ७५ किमी नवीन उच्च दाब व ४३ किमी लघुदाब वीजवाहिनी, ११९ वितरण रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात आली आहेत. ५० किमी एरियल बंच केबल टाकण्यात आली आहे.