रत्नागिरी:- कोकण हापूसची वाशी बाजार समितीमधील आवक 31 हजार पेट्यांवर पोचली आहे. आवक वाढल्यामुळे पेटीचे दर एक ते दिड हजार रुपयांनी कमी झाले आहेत. दर कमी होण्याला रेड सी मध्ये हौती समुद्रातील हल्ल्यांमुळे युरोपकडील रखडलेल्या निर्यातीचेही कारण पुढे येत आहे. समुद्रमार्गे होणारी निर्यातीचा भार हवाई वाहतुकीवर वाढल्यामुळे मागणी असूनही युरोप, युएसला आंबा निर्यात होत नाही. हा माल बाजारातच राहिल्यामुळे दरावर परिणाम झाल्याचे कारण पुढे केले जात आहे.
हापूसचा हंगाम यंदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासुनच सुरू झाला. कोकणातून दिवसाला पाचशेपेक्षा अधिक पेट्या वाशी बाजारात पाठविण्यात येत होत्या. यंदा हापूसचे वारेमाप पिक येईल असा अंदाज होता. मात्र थ्रिप्स आणि जानेवारी महिन्यात पडलेल्या पावसाने हापूसला फटका बसला. मोहोर गळून गेल्याने उत्पादनावर परिणाम झाला. अनियमित थंडीमुळे दुबार मोहोराचे संकट बागायतदारांपुढे आहे. आंबा काढणी वेगाने सुरू असतानाच शेवटच्या टप्प्यात आलेला मोहोर वाचविण्यासाठी बागायतदार औषध फवारण्या करीत आहेत. पहिल्या टप्प्यात आलेला बहर आता ओसरला असून दुसर्या टप्प्यातील फळ काढणीला सुरवात झाली आहे. सुरवातीला बाजारात पेटीचा दर साडेसहा हजार रुपयांपर्यंत होता. हा दर पहिल्या पंधरवड्यात स्थिर होता. पण त्यानंतर परराज्यातील आंब्यांची आवक वाढू लागल्यामुळे हापूसच्या दरावर परिणाम झाला. मार्च महिन्याच्या सुरवातीला उन्हाच्या कडाक्यामुळे तयार झालेला आंबा काढणीसाठी बागायतदार सरसावले. शनिवारी (ता. 16) वाशी बाजारात 39 हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. त्यातील 31 हजार पेट्या हापूसच्या असून उर्वरित 8 हजार पेट्या अन्य राज्यातील आहेत.
वाशी बाजारावर हापूसचे दर अवलंबून असतात. गेल्या चार दिवसात हापूसचा पेटीचा दर 2 हजार ते साडेचार हजार रुपये आहे. बाजारातील आवक वाढल्यामुळे दरावर परिणाम झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. तसेच लाल समुद्रात हुथी बंडखोर गटाने मालवाहू जहाजांवर हल्ले केल्याचे प्रकार पुढे आले आहेत. त्याचा परिणाम समुद्रातून होणार्या वाहतुकीवर झाला आहे. अनेक कंपन्यांनी सुएझ कालव्याचा मार्ग टाळत केप ऑप गुड होपचा मार्ग स्वीकारण्यास सुरवात केली आहे. त्याचा फटका भारतामधील निर्यातीला बसला आहे. अनेक कंपन्यांनी युरोपसह अमेरिका, आखाती देशामध्ये मालवाहतुकीसाठी हवाई मार्गाचा अवलंब केला आहे. त्यामुळे हवाई कंपन्यांवर भार वाढला असून हापूसच्या निर्यातीत अडथळा निर्माण झाला आहे. निर्यात होणारा माल स्थानिक बाजारात राहिल्यामुळे दर वाढल्याचे मुख्य कारण असल्याचे वाशीतील व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. वाशीतील हापूसचे दर सुमारे 1 ते दीड हजार रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे बागायतदार चिंतातूर झाले आहेत. वाशीतील दर कमी झाले असले तरीही वैयक्तिकरित्या आंबा विकणार्यांना चांगला दर मिळत आहे.