रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळातून मंडणगड, दापोली तालुके सावरु लागले असून नुकसानीचे भयंकर चित्र हळूहळू पुढे येऊ लागले आहे. या वादळाचा फटका जिल्हा परिषदेच्या 905 मालमत्तांना फटका बसला असून सुमारे 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा प्राथमिक अंदाज असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी दिली.
निसर्ग वादळ पुढे गेल्यानंतर अध्यक्ष बने यांनी मंडणगड, दापोली तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन आढावा घेतला. या दोन्ही तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला असून तेथील जनजीवन सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी जाईल असे चित्र दिसत आहे. झाडे रस्त्यांवर कोसळल्यामुळे 544 किलोमीटरचे रस्ते बाधित आहे. ते रस्ते मोकळे करण्याचे काम अजून सुरु आहे. वादळामध्ये 110 ग्रामपंचायत कार्यालये, 182 समाज मंदिरे, 175 स्मशानशेड, बांधकाम विभागाच्या 4 इमारतींचे पत्रे उडून ती उघडयावर पडलेली आहेत. छत उडून गेल्यामुळे इमारती उघड्या बोडक्या झालेल्या आहेत. काही कार्यालयातील कागदपत्रेही भिजून गेलेली आहेत. आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र 21, उपकेंद्र 32, जिल्हा परिषद शाळा 219, अंगणवाडीच्या 129 इमारती, 1 पशु दवाखाना, 1 वसतीगृह आणि माध्यमिकच्या 31 शाळा बाधित झालेल्या आहेत. वादळात पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. शासकीय कार्यालयांची छते दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य पाठविण्यात येणार आहे. शासनाकडूनही निधीची मागणी करण्यात आल्याचे श्री. बने यांनी सांगितले.