वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी ती बनली सरपंच; निवे बुद्रुकच्या कल्याणीची नवी इनिंग

कोकणातील सर्वाधिक लहान वयातील सरपंच बनण्याचा मान निवे बु. ग्रामपंचायतीला

रत्नागिरी:- वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी सरपंच बनण्याचा बहुमान निवे बुद्रुक गावातील कल्याणी जोशी हिला मिळाला आहे. इतक्या कमी वयात सरपंच बनणारी कल्याणी ही कोकणातील पहिलीच तरुणी असावी. गावच्या विकासासाठी तिने हा निर्णय घेतला आहे. 
 

ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यानंतर आता सरपंचपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. ठिकठिकाणी अनेकांची सरपंच होण्यासाठी धडपड सुरू आहे. संगमेश्‍वर तालुक्यात सर्वात कमी वयाची सदस्य म्हणून निवे बुद्रुक येथील कल्याणी ही बिनविरोध निवडून आली. गावच्या विकासाचा ध्यास घेऊन कल्याणीने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा विचार पक्‍का केला होता. उच्चशिक्षित असल्याने गावकर्‍यांनीही तिला बिनविरोध निवडून देण्याचा निर्णय घेतला. गावपॅनलच्या माध्यमातून ती निवडून आली. त्याचबरोबर तिच्या हातात गावाचा कारभार देण्याचा निर्णयही घेतला. बुधवारी ग्रामपंंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सरपंचपदाची माळ पडल्याने सर्वात तरूण वयात सरपंच होण्याचा मान कल्याणीने मिळवला आहे.
21 व्या वर्षी ती सरपंच बनली आहे. कोकणातील इतक्या लहान वयातील ती तरूण सरपंच बनली आहे. बहुधा राज्यातील ही पहिलीच सरपंच असावी. तिला सरपंच बनवण्यासाठी गावातील लवू माने, प्रकाश जोशी, विजय राऊत, कृष्णा जोशी, अमोल जाधव, सुरेश महाडिक, दिनकर विभूते, सचिन इप्‍ते, दीपक लिंगायत, बी. टी. यादव, वैभव गावणकर, अनंत चौगुले यांचा मोलाचा वाटा होता.