लोवले येथे खासगी मिनीबसची दुचाकीला धडक

देवरूख:- संगमेश्वर मार्गावरील लोवले येथे खासगी मिनीबसने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना शुक्रवार दि. १८ मार्च रोजी घडली. या  अपघातामध्ये दुचाकीवरील दोन जण जखमी झाले आहेत. मिनीबस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमेश्वर पोलीस ठाण्यातुन मिळालेल्या अधिक माहितीनुसार याबाबतची फिर्याद दुचाकीस्वार नितीन दळवी ( रा. निवे) यांनी दिली आहे. नितीन दळवी हा आपल्या ताब्यातील दुचाकी (क्रमांक टीएन- ६४, ए- ४६९१) घेऊन निवे येथून डेरवणकडे जात होते. त्यांच्यासमवेत त्यांचे वडील विलास दळवी होते. लोवले येथे एका गतिरोधकावर दुचाकीला मिनीबसने धडक दिली. मिनी बस (एमएच-२३, इ- ९९६० ) कोल्हापूरहून गणपतीपुळेच्या दिशेने जात होती. शंकर सूर्यवंशी यांचे नियंत्रण सुटल्याने मिनी बसची दुचाकीला धडक बसली. हा अपघात सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडला. अपघातामध्ये नितीन दळवी व विलास दळवी हे जखमी झाले आहे. यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. दिलेल्या फिर्यादीवरून शंकर सूर्यवंशी यांच्यावर संगमेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.