खेड:- तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहती मधील एका कंपनीमध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उमेश चौरसिया या कामगाराचा ३० फूट उंचीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली.
लोटे परशुराम औद्योगिक वसाहत अपघात, प्रदूषण आणि कामगारांची असुरक्षा याबाबतीत कायमच चर्चेत राहिली आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एका कंपनीच्या छताचे पत्रे बदलण्याचे काम सुरू होते. ठेकेदाराच्या ठेकेदारीत काम करणारा उमेश चौरसिया हा कामगार सुमारे ३० फूट उंचावरून खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रथमदर्शनी तो गंभीर जखमी असल्याचे समजून सहकाऱ्यांनी तात्काळ त्यास नजीकच्या रुग्णालयात नेले; परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला उपचाराला दाखल करण्यापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचा मृतदेह कळबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.