रत्नागिरी:- असंतुष्ट लोकांची आघाडी आमच्यावर टीका करतेय. मात्र ज्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लढण्याच्या डरकाळ्या फोडल्या ते वाघ गेले कोठे? असा सवाल करत आमच्याकडे उमेदवारीसाठी गर्दी आहे तर तिकडे सगळे ओस पडलेय, अशी टीका पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली.
गुरूवारी पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी दौर्यावर होते. शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर आजही आपला दावा कायम आहे असे सांगून त्यांनी ‘वेट ऍण्ड वॉच’ असा सूचक इशारा दिला आहे.
असंतुष्ट लोकांची आघाडी आमच्यावर टीका करतेय असे म्हणत ते म्हणाले की, ज्यांचा आमच्याशी काही संबंध नाही त्यांनी टीका करू नये. सातत्याने आमचे उमेदवार जाहीर होत आहेत. उमेदवाराचे राजकीय वलय, उमेदवाराचा आवाका पाहून उमेदवारी जाहीर होत आहे. त्यामुळे काहींना पोटशूळ उठल्याची टीका ना. सामंत यांनी केली.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लढण्याच्या डरकाळ्या फोडण्यात आल्या. मात्र आता डरकाळ्या फोडणारे वाघ गेले कोठे? त्यांना शोधण्याची वेळ आली आहे. ज्या असंतुष्ट आघाडीला अजून पंतप्रधान पदाचा उमेदवार सापडलेला नाही त्यांचे भवितव्य या निवडणुकीत काय असेल हे लवकरच स्पष्ट होईल.
लोकसभा उमेदवारीवरून आरोप-प्रत्यारोप होत असताना ना. सामंत यांनी सांगितले की, आम्ही ४५ पेक्षा जास्त जागा या निवडणुकीत जिंकणार आहोत. आमच्याकडे उमेदवारीसाठी मोठी गर्दी आहे तर तिकडे सगळं ओस पडलेलं आहे.
कल्याणमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे एका महिलेला उमेदवारी दिली आहे. त्या महिलेचे आम्ही कौतुक करतो. मात्र आमच्यासमोर जे उमेदवार देताय ते उमेदवार निदान सक्षम आणि तुल्यबळ तरी द्या, असा खोचक टोला ना. उदय सामंत यांनी यावेळी लगावला.
दोन दिवसांपूर्वी ना. सामंत यांच्यावर टीका झाली होती. त्या टीकेला उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, वैयक्तिक टीकेवर कोणी येऊ नये. घरापर्यंत येणार असाल तर माझ्याकडेही तुमची जंत्री आहे. जे संस्कार विसरलेत त्यांनी आम्हाला संस्कार शिकवू नयेत असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरील दावा आजही आम्ही सोडलेला नाही. मात्र प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. घाबरून उमेदवारी मागे घेतली अशा आवया उठविण्यात आल्या. मात्र मी कोणाच्याही धमकीला घाबरत नाही असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.
किरण सामंत असोत, नारायण राणे असोत, रविंद्र चव्हाण असोत किंवा मी स्वतः असो, हा आमचा आपसका मामला आहे. आमचं आम्ही बघू, इतरांनी आमच्यात लुडबूड करू नये. मी राणेंना भेटलो तर बिघडले कुठे? ज्यांनी आपला पराभवच निश्चित केला आहे त्यांनी आत्मचिंतन करावे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.