रत्नागिरी:- ‘स्वराज्य’ हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे इंग्रजांना ठणकावून सांगणार्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 1 ऑगस्टची 2020 ची पुण्यतिथी अतिशय साधेपणाने करावी लागणार आहे. कोरोनामुळे मंदिरे, स्मारकामध्ये प्रवेश बंदी असल्याने इतिहासात प्रथमच हे होणार आहे. एवढेच नाही, तर येथील जन्मस्थान विकासासाठी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सकडुन तयार करण्यात येणारा आराखडाही रखडला आहे.
राज्य संरक्षित येथील लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळाची अवस्था विदारकच आहे. सुस्थितीत नसलेली छतावरील कौले आता काढून ठेवली आहेत, स्मारकाचा उडालेला रंग, तुटलेले म्युरल हेच याही पुण्यतिथीनिमित्त पहायला मिळणार आहे. पुरातत्त्व विभागाने तात्पुरती रंगरंगोटी आणि स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. मात्र राष्ट्रपुरुषांच्या जन्मस्थानाची ही परिस्थिती यापूर्वीही वेदना देणारी होती, आजही आहे. स्मारकाच्या विकासासाठी आजवर कोणताच प्रस्तावच तयारच झालेला नाही.
टिळक जन्मभूमी पुरातत्त्व खात्याने मूळ रूपात जतन करून ठेवली आहे. त्या काळचे घर जसेच्या तसे जतन करण्यात पुरातत्त्व विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या घरावर पूर्वीचे नळे (कौले) असून आतील भागही जतन केला आहे. जुने कोनाडेही जतन करण्यात आले आहेत. या घरामध्ये वस्तुसंग्रहालय असून त्यात वंशावळ, दुर्मिळ फोटो, टिळकांचा चष्मा, लेखणी आदी दुर्मिळ वस्तू आहेत. टिळक स्मारकाची विदारक स्थिती पुढे आणल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी डिसेंबरमध्ये याबाबत थिबापॅलेस येथे महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये टिळक स्मारकाचे मूळ स्वरूप जतन करीत ते अधिक आकर्षित आराखडा तयार करण्याची जबाबदारी जे जे स्कूल ऑफ आर्टसने घेतली होती. मात्र त्यानंतर पुढे त्याला अपेक्षित गती मिळालीच नाही. त्यात लॉकडाउन आले. यामध्ये धार्मिक स्थळांसह स्मारकांमध्ये प्रवेश बंदी केली.1 ऑगस्टला 2020 लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानात प्रवेश बंदी असणार. पुण्यतिथी स्वच्छता, रंगरंगोटी, रांगोळी काढण्यापर्यंत मर्यादित राहणार आहे.