लॉकडाऊनमध्ये सर्वात मोठी कारवाई; राजापूर वाटूळ येथून 1 कोटी 60 लाखांचा मद्यसाठा जप्त 

लांजा:– गोवा बनावटीची दारूची अवैधरीत्या वाहतूक करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राजापूर तालुक्यातील वाटुळ येथून जप्त केला आहे.यामधील 1 कोटी 60 लाख 80 हजार रु.चा दारूसाठा ताब्यात घेण्यात आला आहे. तर कंटेनर इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी कंटेनर चालक मोहम्मद अब्दुल इझात (वय ४७, राहणार कसारारोड केरळ) याला अटक करण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधीक्षक डॉ. व्हि.एच तडवी हे बुधवारी मुंबई‚गोवा महामार्गावर गस्त घालत असताना गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारा कंटेनर संशयास्पद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी टाटा कंपनीचा कंटेनर (क्र.एम एच 12 एलटी 7835) याला तपासणीसाठी थांबवले. यावेळी कंटेरनमध्ये रॉयल ब्लू विस्कीच्या एका बॉक्समध्ये ४८ याप्रमाणे 1800 बॉक्समध्ये 86 हजार 400 बॉटल तर दुसऱ्या 400 बॉक्समध्ये 4800 बाटल्या असा 1 कोटी 60 लाख 80 हजार रु.चा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. तर कंटेनर ,मोबाइल असे साहित्य  जप्त करण्यात आले आहे. तर प्रभारी अधीक्षक डॉ. व्हि.एच तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुधीर भागवत, वाहन चालक संदीप विटेकर, जगदीश गोताड,  दिनेश माने, रोहित देसाई,साजिद शहा यांनी ही कारवाई केली तर या गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक अमित पाडळकर यांच्याकडे देण्यात आला आहे. लाॅकडाऊन कालावधीत रत्नागिरी उत्पादन शुल्क विभागाने  सर्वात मोठी कारवाई केले आहे.