6 महिन्यात आठ गुन्हे; साडेचार लाखांची फसवणूक
रत्नागिरी:- लॉकडाऊनच्या काळात गंभीर, अतिगंभीर आणि किरकोळ अशा सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांना चाप बसला असताना ऑनलाईन गुन्ह्यांच्या बाबतीत मात्र चित्र वेगळेच आहे. लॉकडाऊन काळात चोरट्यांना ऑनलाईन गुन्ह्यांचा आधार असून जिल्ह्यात मार्च ते ऑगस्ट या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन फसवणुकीचे आठ गुन्हे दाखल झालेले असून फसवणुकीची रक्कम सुमारे 4 लाख 27 हजार 572 इतकी आहे.
हे गुन्हे सावर्डे, खेड, संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. यातील सर्वात जास्त चार गुन्हे हे चिपळूण येथील आहेत. ऑनलाईन फसवणुकीमध्ये एखाद्या अज्ञात मोबाईल नंबरवरून कॉल येतो आणि बोलणारा ‘मी बँकेतून बोलत असून तुमच्या एटीएम कार्डची सेवा बंद झाली आहे. ते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी तुमच्या कार्डवरील 16 अंकी नंबर आणि पिन नंबर द्या’ असे सांगतो. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अनेक नागरिक सर्व माहिती त्याला देतात आणि काहीवेळाने बँक खात्यातून पैसे काढल्याचे मेसेजेस आले की डोक्याला हात लावतात.
आतापर्यंत शहरी भागातील मध्यम आणि उच्च मध्यम वर्गापर्यंत मर्यादित असणार्या सायबर गुनहेगारांनी आपले हातपाय आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पसरले असून ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढू लागल्या आहेत. या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी आर्थिक लूट केली आहे. ऑनलाईन बँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्ड फसवणूक आणि अन्य माध्यमांतूनही गुन्हेगारांनी सामान्यांच्या पैशांवर डल्ला मारण्यास सुरूवात केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर होताच सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांनी घरातच बसून काम करण्यास प्राधान्य दिले. आजही अनेकजण वर्क फ्रॉम होम करत असून त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करण्याकडे कल वाढला आहे. याच काळात ग्रामीण भागामध्ये सायबर गुन्हेगारीचा आलेख वाढू लागला. कॅशबॅकच्या नावाखाली गुन्हेगार ज्येष्ठ नागरिक, महिला यांना लक्ष्य करत असून गुन्हेगारांच्या जाळ्यात तरुणवर्गही अडकत आहे. काही ठिकाणी तर केवायसी अपडेटचेही कारण पुढे करत नागरिकांच्या बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारला जात आहे. ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे होणार्या फसवणुकीचा आकडा सर्वाधिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
खरे म्हणजे कोणतीही बँक ग्राहकांकडे त्यांच्या एटीएम कार्डची माहिती मागत नाही. तसेच याबाबत बँकांकडूनही वारंवार जनजागृती करण्यासाठी ग्राहकांना मेसेजेस पाठवले जातात. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून अनेक नागरिक अशा तोतयांना आपल्या बँक खात्याची खरी माहिती देऊन फसतात. त्याचप्रमाणे काहीवेळा नागरिकांना अज्ञात नंबरवरून फोन करणारा तुम्हाला लॉटरी लागली आहे असे सांगतो. बक्षिसाची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी खात्याची माहिती मागितली जाते. बक्षिसाच्या आमिषाने नागरिक आपल्या खात्याची माहिती देऊन फसतात. अशाप्रकारच्या गुन्ह्यांचा छडा लागण्याचे प्रमाण खूप कमी असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या फोन कॉल्सना बळी न पडता आपल्या बँक खात्याची आणि एटीएमकार्डची कार्डची माहिती कोणालाही न देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आले आहे.
राज्यातील गुन्ह्यांच्या स्थितीचा विचार करता अनेक तक्रारी महिलांसंदर्भातील सुद्धा येत आहेत. महाविद्यालयीन तरुणी, महिलांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून बदनामी केली जाते. या तक्रारींच्या चौकशीत जवळचा नातेवाईक, मित्र महिलांना त्रास देत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याबरोबरच ऑनलाईन वाहन खरेदी, गिफ्ट फ्रॉड, केबीसीच्या नावाने फसवणूक झाली आहे. बँकेतून बोलत असल्याचे भासवून बँक खात्याची, एटीएम कार्डची माहिती विचारून फसवणूक होत आहे; परंतु सध्या एटीएमची माहिती घेऊन फसवणुकीचे प्रकार कमी झाले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सुरुवातीला संवाद साधला जातो. त्यानंतर मोबाईल क्रमांक घेऊन मैत्री केल्यानंतर मोबाईल, लॅपटॉप व इतर वस्तू पाठविण्याचा बहाणा केला जातो. त्यामुळे अनोळखी व्यक्तींशी सोशय मीडियावरून संवाद साधू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.