रोहा ते वीर दुपदरीकरण चार महिन्यांत पूर्ण

कोरे वेगात धावणार; मार्गाच्या क्षमतेत सुधारणा

रत्नागिरी:-कोकण रेल्वेवरील प्रवास येत्या चार महिन्यानंतर वेगवान तसेच विनाअडथळा होणार आहे. कोरोनामुळे रेंगाळलेले रोहा ते वीर या मार्गाचे दुपदरीकरण येत्या चार महिन्यात पूर्ण होणार आहे. याशिवाय महत्वाकांक्षी असलेला क्रॉसिंग स्थानक प्रकल्पही पूर्ण झाला असून कोकण मार्गावरील प्रवास सुरळीत होईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.

कोकण रेल्वेवरुन प्रत्यक्षात कोकण व त्यामार्गे जाणार्‍यांची संख्या अधिक आहे. याशिवाय मालवाहतुकही मोठया प्रमाणात होते. सध्या दोनच मार्ग असल्याने गर्दीच्या काळात अधिक संख्येने गाडया सोडल्यास कोकण मार्गावरील वाहतुक कोलमडते. त्यामुळे कोकण मार्गावरील प्रवास सुकर करण्यासाठी रोहा ते ठोकूर असे 700 किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला होता; परंतु अनेक अडचणी पाहता रोहा ते वीर या 46 किलोमीटरचे काम पूर्ण करण्याचे काम हाती घेतले. गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या या कामाला अंतिम स्वरुप दिले जात आहे. जवळपास 95 टक्के  काम पूर्ण झाले असून ऊवरित काम तीन ते चार महिन्यात पूर्ण होईल, असा विश्वास कोकण रेल्वेच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांची क्षमता वाढेल. शिवाय वेळापत्रकही सुरळीत होईल. या प्रकल्पाबरोबरच एकमेकांना रुळ ज्या ठिकाणी (क्रॉस) छेदतात अशा ठिकाणी क्रॉसिंग स्थानक प्रकल्पाचे कामही पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांतर्गत आठ नवीन स्थानके सेवेत येत आहेत. डिसेंबर 2019 मध्ये हे दोन्ही प्रकल्प पूर्ण होणार होते. परंतु तांत्रिक कारणे, करोना, टाळेबंदीमुळे प्रकल्प कामे रेंगाळली होती. या प्रकल्पाचा खर्च 202 कोटी रुपये आहे. यामध्ये रुळांच्या जोडणीपासून बरीच कामे करण्यात आली. एखाद्या ठिकाणी रुळ हे एकमेकांना छेदत असतील, तर अशा ठिकाणी दोन लांब पल्ल्याच्या गाडया एकमेकांना ओलांडून जाऊ शकत नाहीत. यामध्ये दोन्ही गाडयांचा बराच वेळ वाया जातो. हा वेळ वाचावा, तसेच दोन्ही गाडयांना मार्ग मोकळा मिळावा या दृष्टिने क्रॉसिंग स्थानक प्रकल्प हाती घेण्यात आला.