रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील रुळावर असणाऱ्या लोखंडी चाव्यांची चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा महिलांची 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आल़ी. भारती गोविंद पड्यार (38, ऱा दाभोळे त़ा संगमेश्वर) व लक्ष्मीबाई बासुराज आडेकर (40, ऱा लांजा ) अशी या महिलांची नावे आह़े. चोरीप्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होत़ी.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 ते 29 जून 2024 दरम्यान कोकण रेल्वे विभागाच्या पानवल पूल ते कोंडवी या मार्गावरील जवळपास 200 पेक्षा जास्त रुळावर लोखंडी चाव्या नसल्याचे रेल्वेच्या कर्मचाऱ्याना दिसून आल़े. त्यानुसार कर्मचाऱ्यानी ही खबर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना दिल़ी. त्यानुसार वरिष्ठांनी पाहणी केली असता अज्ञात चोरट्याने एकूण 223 लोखंडी चाव्या चोरल्या असल्याचा संशय रेल्वेच्या अधिकाऱ्यानी व्यक्त केल़ा. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत भादंवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा.
पोलिसांच्या तपासामध्ये रेल्वे रूळावरील चाव्यांची चोरी ही संशयित महिलांनी केली असल्याचे समोर आल़े. त्यानुसार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून या दोन्ही महिलांना अटक करण्यात आल़ी. दोन्ही महिलांनी आपली जामीनावर मुक्तता करावी यासाठी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होत़ा. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी दोन्ही महिलांची 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केल़ी.