रत्नागिरी:- कोविड आपत्कालीन परिस्थितीमुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण निदान, औषधोपचाराचे प्रमाण मागील वर्षांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. जिल्ह्यात रुग्ण शोध मोहिम आणि संनियंत्रण अभियानांतर्गंत जिल्ह्यात 1,230 पथकांमार्फत ग्रामीण भागातील 15 लाख 68 हजार 895 व शहरी भागातील 58 हजार 29 लोकसंख्येचे सर्वेक्षण केले जाणार आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती महेश उर्फ बाबू म्हाप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापुरकर उपस्थित होते. या सभेत अधिकार्यांशी चर्चा केली. तालुका, जिल्हास्तरीय अधिकारी व प्रतिनिधी यांना अभियान नियोजन पध्दतीने यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अभियानांतर्गंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत प्रत्यक्ष कुष्ठरुग्ण शोध मोहिम राबवली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई यांनी दिली. यावेळी ग्रामीण भागातील लोकसंख्या व शहरी भागातील 30 टक्के लोकसंख्येचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाणार आहे. प्रथम अवस्थेतील विना विकृती कुष्ठरुग्ण शोधून त्वरीत उपचाराखाली आणले जाणार आहेत. कुष्ठरोग संसर्गाची साखळी खंडित करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियाना करता जिल्हास्तर, तालुकास्तर, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर नियोजनबध्द पध्दतीने पथके तयार केली आहे. 1,230 पथकांमार्फत जिल्ह्यात सर्वेक्षण केले जाणार आहे. समाजात असलेले संशयित कुष्ठरुग्ण शोधून प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर उपचाराखाली आणण्यात येणार आहेत, असे डॉ. सय्यद यांनी सांगितले.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गंत जिल्हास्तरीय क्षयरोग मंच समितीची स्थापना केली आहे. या समितीची बैठक जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविजय मुळ्ये उपस्थित होते. या बैठकीत क्षयरुग्णांना मिळणार्या लाभाबद्दल माहिती देण्यात आली. क्षयरुग्णांना निक्षय पोषण योजनेतून 500 रुपये महिन्याला लाभ द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत.