खेड:- राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हा सरचिटणीस जलाल राजपूरकर यांना खाडीपट्ट्यातील नांदगाव येथे शनिवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली. याबाबत सायंकाळी उशिरा चौघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस जलाल राजपूरकर यांचे नांदगाव येथे हॉटेल पिकनिक पॉईंट आहे. ते खेडमधून घरी जात असताना काहीजण मद्यप्राशन करण्यासाठी बसल्याचे निदर्शन आल्यानंतर तेथे जाऊन त्यांना हटकले. याचा राग मनात धरून अन्य चारजणांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्याने चौघांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली. तोपर्यंत चारही व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाल्या होत्या.
येथील पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. दरम्यान, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस जलाल राजपूरकर यांच्यावर हल्ला झाल्याच्या शक्यतेने राष्ट्रवादीमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र नेमकी वस्तूस्थिती सायंकाळी उशिरा स्पष्ट झाल्यानंतर लढवण्यात आलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. येथील पोलिसांकडून त्या चार अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.