चिपळूण:- रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना पराभूत करत, मतांनी दणदणीत विजय मिळवला. 27 व्या फेरीत ते 80 हजार मतांनी आघाडीवर होते. त्यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.
पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या तटकरे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत पकड कायम ठेवली. विजय निश्चित होताच नेहुली ता. अलिबाग येथील मतमोजणी केंद्राबाहेर राष्ट्रवादीसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. सलग दुसर्यांदा सुनील तटकरे यांनी निवडून येत रायगड लोकसभा मतदारसंघावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
रायगडातील या लढतीकडे सर्वांचेच लक्ष होते. तटकरे विरुद्ध गीते ही लढत अटीतटीची होईल, असे वाटत होते. मात्र आज (4 जून) सकाळी 8 वाजता प्रत्यक्षात मतमोजणी सुरु झाली, 28 फेर्यांमध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार होती. पहिल्या फेरीची आकडेवारी हाती आली तेव्हा तटकरे 592 मतांनी आघाडीवर होते. दुसर्या फेरीत 5 हजार 383, तिसर्या फेरीत 10 हजार 745 अशी मतांची आघाडी वाढतच गेली. त्यानंतर एक एक करुन सर्व फेर्यांची आकडेवारी समोर आली आणि सर्व फेर्यांमध्ये तटकरेंनी आपली आघाडी कायम ठेवली ती शेवटच्या फेरीपर्यंत.27 व्या फेरीत तटकरे 80 हजार 728 मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे निकाल जाहीर होण्याची केवळ औपचारिकता राहिली आहे. विजय निश्चित होताच कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जोरदार जल्लोष केला.