राज्यात पहिल्या ५ मध्ये रत्नागिरी जिल्हा बॅंकेचा समावेश

उपमुख्यमंत्री अजित पवार; ३० टक्के लाभांश देणारी देशातील पहिली बँक

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सभासदांना ३० टक्के लाभांश देऊन देशातील पहिली बँक होण्याचा मान मिळवला आहे. बँकेच्या ठेवी, कर्जव्यवहार या गोष्टींचे अवलोकन करता बँकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे तसेच राज्यातील पहिल्या पाच बँकांमध्ये या रत्नागिरी जिल्हा बँकेचा समावेश होतो, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री अजित पवार यांनी केले.

सोमवारी रत्नागिरीत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस सदिच्छा भेट दिली. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी त्यांचा सत्कार बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे व उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी केला. रत्नागिरी जिल्हा बँक राज्यामध्ये अग्रेसर होण्यासाठी डॉ. चोरगे यांच्यासारखे अभ्यासू, चांगला उद्देश ठेवून आपल्या तत्त्वाशी बँक हिताकरिता कोणतीही तडजोड न करता आणि बँकेला पूर्ण वेळ देणारे नेतृत्व मिळाले आहे. बँकेच्या सर्व संचालकांना विश्‍वासात घेऊन चांगले निर्णय घेतल्यामुळे बॅंकेने चांगले यश मिळवले आहे. त्यामुळेच राज्य सरकारने शासकीय निधी ठेवण्याकरिता मान्यता दिलेल्या १४ बँकांमध्ये रत्नागिरी जिल्हा बँकेचा समावेश करण्यात आलेला आहे. डॉ. चोरगे यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून सहकार चळवळीसाठी सूचना केल्यास त्याचा शासनस्तरावर निश्‍चितपणे विचार केला जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

शासनाच्या ठेवी जिल्हा बॅंकेत वळवा
शासनाच्या ठेवी जिल्हा बँकेकडे वळवण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, बँकेचे संचालक व आमदार शेखर निकम यांनी संबंधितांना सूचना द्याव्यात. जिल्हाधिकारी यांनीही यात लक्ष घालावे, अशी सूचना अजित पवार यांनी केली.