राजापूरहून रत्नागिरीला आलेली एसटी मनसेने धाडली माघारी 

रत्नागिरी:- रत्नागिरीत राजापूरहून रत्नागिरीत आलेली एसटी बस येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अडवून ‘गांधीगिरी’ केली. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावेळी होणारा पुढील गोंधळ टाळण्यासाठी ही एसटी बस मारूतीमंदिर येथेच अडवून पुन्हा राजापूरला माघारी धाडली. 


  राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे न्याय मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलनाला 15 दिवस उलटले आहेत. तरीही शासनस्तरावरून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर योग्य चर्चा वा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे जोपर्यंत एसटीचे विलगीकरण व कर्मचारी मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या संपातून माघार घेणार नसल्याच्या पवित्र्यात कर्मचारी दिसून येत आहेत. या कर्मचाऱ्यांना विविध राजकीय संघटनांनीही पाठींबा दर्शवला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवलेला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अन्याय होउ न देण्यासाठी संघटनास्तरावरून जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. 

   रत्नागिरीत एसटी कर्मचाऱ्यांचे सुरू असलेल्या आंदोलनाला येथील मनसेच्यावतीने खंबीर पाठींबा दिलेला आहे. कर्मचारी संपावर असताना एसटी प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना सेवेत हजर होण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच एसटी फेऱ्याही काही मार्गावर चालविण्याचे पाउल उचण्यात आलेले आहे. मंगळवारी 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.30 वा. राजापूरहून रत्नागिरीकडे काही प्रवाशांना घेउन येत होती. याची कुणकूण येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना लागली. मारूतीमंदिर येथे ही एसटी बस येताच येथील सर्पल जवळ मनेसेच्या पदाधिकाऱ्यांनी अडवली. एसटी बस पुढे न नेण्यासाठी चालक-वाहकाला विनंती करत गांधीगिरी केली.  

   ही एसटी बस रत्नागिरी माळनाका येथील डेपोसमोरून जाणार होती. त्याठिकाणी कर्मचाऱयांचे आंदोलन लक्षात घेता मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एसटी चालक व वाहकाची समजूत काढत ही बस पुन्हा वळवून राजापूर येथे नेण्याची विनंती करण्यासाठी पुष्पगुच्छही दिला. त्यावेळी मनसे कामगार सेनेचे अनिरुध्द उर्फ छोटू खामकर, उपाजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत, शहराध्यक्ष सतीश राणे, उपशहराध्यक्ष मयुरेश मडके, अमोल श्रीनाथ, अक्षय माईण, सर्वेश जाधव, राहुल खेडेकर, अजिंक्य केसरकर, अमोल शिंदे, व सर्व मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. जेणेकरून कर्मचाऱयांच्या आंदोलनामुळे वेगळे वळण लागू नये याची दक्षता मनसेच्यावतीने घेण्यात आली. त्यामुळे मारूतींमंदिर येथूनच एसटी बस राजापूरकडे पुन्हा माघारी वळली. या बसमधून रत्नागिरीत आलेल्या पवाशांना मारूतीमंदिर येथे उतरवून रिक्षाने एसटी स्थानकापर्यंत मनसेच्यावतीने सोडण्याची व्यवस्था करण्यात आली.