राजापुरात कुत्र्याच्या वादातून सख्ख्या भावावर हल्ला

राजापूर:- राजापूर तालुक्यातील ओझर धनगरवाडी येथे कुत्र्याच्या वादातून सख्ख्या मोठ्या भावाने लहान भावाला मारहाण केल्याची घटना २८ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. सुरेश बाब्या पटकारे (५५, ओझर धनगरवाडी, राजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद तानाजी बाब्या पटकारे (४८, ओझर धनगरवाडी, राजापूर) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात दिली.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तानाजी पटकारे हे घरी एकटेच असताना त्यांचा कुत्रा घराबाहेर गेला होता. तो ओरडण्याचा आवाज आल्याने ते घराबाहेर त्याला पाहण्यासाठी गेले. त्यावेळी बाहेर आप्पा गुरव दिसले. तानाजी पटकारे आप्पा गुरव यांना म्हणाले ‘आप्पा काय केलास कुत्र्याला तुम्ही मारला का?’ असे विचारले. याचवेळी तेथे आलेला तानाजी यांचा मोठा भाऊ सुरेश पटकारे याने ‘माझ्या घरात कोण येतो कोण नाही तुला काय करायचं असे बोलून तानाजी यांच्या घरातील अंगणात नेऊन मारहाण केली. यावेळी सुरेश पटकारे याची पत्नी मंदा ही सोडवण्यासाठी आली. परंतु त्यांचे न ऐकता तानाजी यांना शिवीगाळ करुन हातावर, पायावर आणि डोक्यात चिव्याच्या काठीने मारहाण केली. अश्लिल शिवीगाळ करत टी शर्ट फाडले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तानाजी पटकारे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सुरेश बाब्या पटकारे याच्यावर भादविकलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.