रनपच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व वॉर्डमध्ये उमेदवार उभे करण्याची तयारी

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांची माहिती 

रत्नागिरी:- राज्यातील मुदत संपलेल्या पालिकांमध्ये रत्नागिरी नगर पालिकेचा समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. सर्व वॉर्डमध्ये उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश शहरातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार असून जेष्ठ नेते राजाभाऊ लिमये, कुमार शेट्ये यांच्या मार्गर्शनाखाली प्रांतीक सदस्य बशिर मुर्तुझा, नगरसेवक सुदेश मयेकर यांच्या नेतृत्वाखाली हि निवडणूक लढविली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील अनेक पालिकांची मुदत येत्या काही महिन्यात संपणार आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पालिकांची मुदत संपण्याअगोदर निवडणूूकांची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी पालिकेच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी सज्ज झाली आहे.नव्या नियमानुसार प्रत्येक वार्ड निहाय बांधणी करण्याची सुचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक वार्ड मध्ये उमेदवार उभे करण्याची तयारी करा, असे आदेश आपण दिले आहेत असे बाबाजी जाधव यांनी सांगितले.

प्रत्येक पक्ष निवडणूकीसाठी सज्ज असतो. त्याप्रमाणे आम्ही निवडूकीची तयारी करत आहोत. निवडणूकीच्या वेळी पक्षाचे वरिष्ठ नेते जो आदेश देतील त्यांची अंमलबजावणी केली जाईल.परुंतू प्रत्येक वार्डात उमेदवार उभा राहिल याची चाचपणी केली जाईल. पक्षाने नेमलेली समिती इच्छूकांसह सक्षम उमेदवारांची  निवड करेल. ज्या वार्डमध्ये एका पेक्षा अधिक इच्छूक असतील त्यांची नावे प्रदेशकडे पाठविण्यात येतील. मात्र पक्षा वाढची दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत असे श्री. जाधव म्हणाले.
 

राज्यात महाविकास आघडी असली तरी सध्या तरी जिल्ह्यात तशी स्थिती  नाही. निवडणूकीच्या तोंडावर  चर्चा करण्यात आली तर समाधानकारक जागा मिळाल्यास आम्ही विचार करुन निर्णय घेवू असे हि बाबाजी जाधव यांनी सांगितले. मागिल निवडणूकीत राष्ट्रवादीला मिळालेली मते पहाता. खा.शरदराव पवार यांना साथ देणारा मतदारांचा मोठा वर्ग शहरात आहे.  त्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.