रत्नागिरीतून हापूसची पहिली पेटी मुंबईला रवाना

रत्नागिरी:- हापूसचा हंगाम यावेळेस निसर्गाच्या लहरी वातावरणातून मार्गकमण करत आहे. पण या 2023 नववर्षाच्या प्रारंभालाच रत्नागिरी तालुक्यातील दोन बागायतदार शेतकर्‍यांनी पहिल्या आंब्याची तोड करून हापूसची पेटी पुणे व मुंबईच्या मार्केटमध्ये पाठवण्याचा मान मिळवला आहे.

हापूसच्या हंगामा पावसाची अधूनमधून येणारे सावट यामुळे आंबा हंगाम चांगलाच कचाट्यात सापडला आहे. या निसर्गाच्या बदलत्या वातावरणाशी झगडत असताना या हंगामातील हापूसची पहिली पेटी रत्नागिरी जिल्ह्यातून पाठवण्याचा मान रत्नागिरी तालुक्यातील दोघा बागायतदार शेतकर्‍यांनी मिळवला आहे.. रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावातील सहदेव पावसकर यांनी जिल्ह्यातील हापूसची पहिली पेटी सोमवारी पुणे येथे पाठवली आहे. गावखडी येथील सहदेव पावसकर यांच्या बागेतील आंब्याला सप्टेंबर महिन्यात मोहर आला होता. या मोहराचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी आंब्याच्या बाजूने नेट लावलं. तसेच आंब्यावर छप्परही टाकलं होतं. अखेर त्यांच्या मेहनतीला यश आलं आहे. त्यांनी तयार झालेल्या आंब्याची तोड सोमवारी केली. त्या तोडणी केलेल्या 48 आंब्याची पहिली पेटी पुणे येथे पाठवली आहे. या पेटीला जवळपास 2000 रुपये दर मिळेल अशी अपेक्षा पावसकर यांनी व्यक्त केली आहे.

गोळप येथील प्रसिध्द बागायतदार शेतकरी तथा कोकण हापूस आंबा उत्पादन आणि उत्पादक विकेते सहकारी संस्था उपाध्यक्ष प्रकाश उर्फ बावा साळवी यांनीही नववर्षाच्या प्रारंभालाच हंगामातील पहिल्या हापूसची तोड केली आहे. त्यांनी आपल्या आंबा बागेतून 2 डझनाची पहिली पेटी मुंबई येथील वाशी मार्केटमध्ये रवाना केली आहे. या पेटीला चांगला दर मिळण्याची अपेक्षा साळवी यांनी व्यक्त केली आहे.