रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मिरकरवाडा आदर्श मच्छीमार सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. संस्थेच्या स्थापनेपासून प्रथमच ११ संचालकांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. यापूर्वीच्या बहुसंख्य निवडणुका गदारोळात झाल्या आहेत. नूतन संचालकांमध्ये ७ विद्यमान संचालक आणि ४ नवीन संचालकांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सुमारे ८० मच्छीमार सहकारी संस्था आहेत. यामध्ये रत्नागिरीतील मिरकरवाडा आदर्श मच्छीमार सहकारी संस्था प्रतिष्ठीत आणि मोठी संस्था आहे. संस्थेचे सुमारे ३५०० सभासद असून संस्थेचा बंदरावर डिझेल पंप आणि रेशनदुकानही आहे. अशा या संस्था संचालकांची निवडणूक नुकतीच झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वाती टिळेकर यांनी काम पाहिले. नूतन संचालक म्हणून इम्रान मुकादम, नुरुद्दीन पटेल, सुहेल साखरकर, नुरुद्दीन वस्ता, बिलाल सोलकर, जुबेर दर्वे, साबीर होडेकर, अझीम होडेकर, जुनेद मजगावकर, अकीला मजगावकर, शकीला मिरकर यांचेच उमेदवारी अर्ज आले. त्यामुळे बिनविरोध निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
संस्थेची स्थापना ५७ वर्षांपूर्वी झाली आहे. स्थापनेपासून निवडणूक कधीही बिनविरोध झाली नव्हती. विद्यमान पदाधिकारी इम्रान मुकादम, नुरुद्दीन पटेल, सुहेल साखरकर, बिलाल सोलकर आदींनी निवडणूक बिनविरोध करण्याबाबत सहकार्य करण्याची विनंती केली होती .