रत्नागिरीतील अट्टल गुन्हेगार एम. पी. डी. ए. ॲक्ट अंतर्गत स्थानबद्ध 

जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई 

रत्नागिरी:- रत्नागिरी पोलिसांनी गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी कठोर पावले उचलली असून एम. पी. डी. ए. ॲक्ट अंतर्गत सराईत गुन्हेगाराला स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी बजावले आहेत.  शाहीद सादिक मुजावर असे स्थानबद्ध केलेल्या संशयिताचे नाव आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात नजिकच्या काळात सराईत गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. त्यामध्ये मादक द्रव्याच्या व्यवसायात गुंतलेल्या गुन्हेगारांविरोधात, अवैध दारु, जुगार, पिटा कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर गुटखा विरोधी, वन्य जीव संरक्षणासाठी देखील रत्नागिरी पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये अनेक गुन्हेगारांना तडीपार केले.

रत्नागिरीतील जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस्), वाळू तस्कर व जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणार्‍या व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी अधिनियम १९८१ (एम. पी. डी. ए. कायदा) अन्वये कारवाईसाठी प्रस्ताव दिले होते.

तत्कालीन शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार शाहिद सादिक मुजावर (वय २७, रा. बेलबाग धनजी नाका) याला एम. पी. डी. ए. कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्यासंदर्भात प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे व उप जिल्हाधिकारी दत्ता भडकवार यांनी छाननी केली होती. १८ ऑगस्ट रोजी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी या कारवाईला महत्त्व देऊन सराईत गुन्हेगार शाहीद मुजावर याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

हे आदेश प्राप्त होताच रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांनी संशयित गुन्हेगार शाहिद सादिक मुजावर याला शोधण्यासाठी विविध पथके तयार केली. गुरुवारी रात्री त्याला ताब्यात घेतले आणि त्याला विशेष कारागृह रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत ठेवण्यात आले.

शाहिद सादिक मुजावर याच्या विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात चोरी, जबरी चोरी, दुखापत करणे, शिवीगाळ करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. सन २०१४ मध्ये त्याला रत्नागिरी जिल्ह्यातून ६ महिन्यांकरीता हद्दपार करण्यात आले होते. मात्र त्याच्या गुन्हेगारी कारवाया थांबल्या नव्हत्या ही जिल्ह्यातील दुसरी कारवाई असून यापूर्वी २०१४-१५ मध्ये गुहागर पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी एका हातभट्टी दारु व्यावसायिका विरुद्ध अशा प्रकारे प्रस्ताव पाठवला होता आणि त्याला स्थानबद्ध करण्यात आले होते.

गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस निरीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग व अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे स. पो. नि. मनोज भोसले, पोलीस उप निरीक्षक संदीप वांगणेकर, पो. हे. कॉं. दीपक जाधव, जयवंत बगड, पो. ना. प्रविण बर्गे, अर्चना कांबळे तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पोलीस उप निरीक्षक विकास चव्हाण, पो. हे. कॉं. मिलिंद कदम, विलास दिडपिसे, संजय कांबळे, विजय आंबेरकर, पो. ना. अमोल भोसले, सत्यजित दरेकर, अपूर्वा बापट, वैष्णवी यादव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील उप चिटणीस सुरेंद्र भोजे, प्रशांत होतेकर यांनी या प्रस्तावावर विशेष मेहनत घेतली.