रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील 37 गावे आणि 204 वाड्यांचा समावेश असलेली सुधारीत मिऱ्या, शिरगाव, निवळीतिठा प्रादेशिक नळपाणी योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी 135 कोटी 72 लाख 78 हजार रुपये खर्च असून लवकरच या योजनेचे काम सुरु होणार आहे.
बावनदी येथील पाण्यावर आधारीत ही नळपाणी योजना असून या योजनेमध्ये 13 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामध्ये जाकिमिऱ्या, सडामिऱ्या, शिरगाव, निवळी, करबुडे, हातखंबा, पानवल, खेडशी, पोमेंडी बुद्रुक, कुवारबाव, मिरजोळे, नाचणे आणि कर्ला ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या योजनेचे सुधारीत मिऱ्या, शिरगाव, निवळीतिठा व 34 गावांची प्रादेशिक नळपाणी योजना असे नाव आहे. या योजनेला 26 एप्रिल रोजी तांत्रिक मान्यता मिळाली व 25 मे रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जलजीवन मिशनअंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेतून प्रत्येक कुटूंबातील माणशी 55 लीटर पाण्याचे वाटप होणार आहे. नळजोडणीद्वारे या योजनेतून 8 कोटी 77 लाख रुपयांची रक्कम वसूल होणार असून योजनेवरील देखभालीचा वार्षिक खर्च 7 कोटी 47 लाख रुपये आहे.
या योजनेंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील 37 गावातील 204 वाड्यांना पाणी पुरवठा होणार आहे. 37 गावांमध्ये जाकिमिऱ्या, मिऱ्या, सडामिऱ्या, आडी, मुसलमानवाडी, शिरगाव, तिवडेवाडी, झाडगाव, निवळी, रावणंगवाडी, धनावडेवाडी, काजरेकोड, कपिलनगर, करबुडे कोंड, करबुडे, कुंभारवाडा, मूळगाव, वेदरेवाडी, डांगेवाडी, हातखंबा, तारवेवाडी, घवाळवाडी, पानवल, खेडशी, पोमेंडी, कारवांचीवाडी, कुवारबाव, मधलीवाडी, मिरजोळे, पाडावेवाडी, शीळ, ठिकाणे दाते, आंबेशेत, नाचणे, जुवे, कर्ला, मुस्लीमवाडी या वाड्यांचा समावेश आहे. या योजनेला प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळाली असून लवकरच या योजनेचा कार्यारंभ आदेश मिळणार आहे. ही योजना पूर्ण करण्याचा कार्यकाल 3 वर्षांचा आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत राजापूर तालुक्यातील पांगरी बुद्रुक येथे 14 गावांची नळपाणी योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेचा अंदाजित खर्च 25 कोटी 65 लाख रुपये आहे. या योजनेमध्ये उन्हाळे, कोंड्ये तर्फे राजापूर, दोनिवडे, शेंबवणे, ससाळे, सोल्ये, जांभवले, आंगले, उपेरे, तुळसवडे, सोलिवडे, ताम्हाणे या गावांचा समावेश आहे. चिंचवडी धरणाच्या पाण्यावर आधारीत ही योजना असणार आहे. त्याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातील प्रादेशिक दुरुस्ती नळपाणी योजना राबवण्यात येणार असून त्याकरीता 11 कोटी 91 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे.