रत्नागिरी:- शहरातील बंद फ्लॅट भरदिवसा फोडून आतील सोन्या ,चांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबविणार्या पुण्यातील पाचजणांच्या टोळीतील तिघांना पकडण्यात शहर पोलीसांना यश आले आहे. तर एकजण अजून फरार आहे. त्यांच्याकडून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना २१ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
रत्नागिरी शहरातील नाचणे सोहमवैभव अपार्टमेंट मधील केदार सहस्त्रबुद्धे यांच्या बंद फ्लॅट दि. ११ एप्रिल २०२३ रोजी भरदुपारी चोरट्यांनी फोडला होता. त्यानंतर केदार सहस्त्रबुद्धे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलीसांनी आज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक आकाश साळूंखे यांच्याकडे देण्यात आला होता. पोलीस निरिक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असताना परिसरातील सीसीटिव्ही कॅमेर्यांच्या आधारे पोलीसांनी चोरट्यांचा माग काढला होता. सुरुवातीला उस्मानाबाद येथील राम लक्ष्मण क्षिरसागर (वय ३६) याला पोलीसांनी अटक केली होती. त्याच्याकडून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र तो त्यांच्या अन्य सहकार्यांची नावे सुरुवातीला सांगत नव्हता. पोलीस कोठडीची मुदत संपत असताना त्यांने आपल्या सहकार्यांची नावे पोलीसांना सांगितली. मात्र तोपर्यंत त्यांचे सहकारी गायब झाले होते.
पोलीस उपनिरिक्षक आकाश साळूंखे संशयीत आरोपींच्या मागावर होते. यावेळी मुळचे पुण्यातील असलेले संशयीत सातारा, सांगली परिसरात असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर शहर पोलीसांच्या पथकाने सुर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने (२७), चंद्रकांत उर्फ चंद्या अनंत माने (२९) या दोन सख्या भावांसह राहुल हिरामन लष्करे (२२) सर्व रा. चिंचवड , पुणे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
केदार सहस्त्रबुद्धे यांच्या घरातून चोरट्यांनी १ लाख रु.रोख रक्कमेसह ४ लाख ३७ हजार ३३१ रु.चा ऐवज लंपास केला होता. त्यामध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यांचा समावेश होता. त्यातील १२.७० गॅमचा ऐवज हस्तगत करण्यत आला आहे.
पुणे येथील चिंचवड येथील पाचजणांची टोळी जिल्ह्यात सक्रिय होती. त्यांनीच केदार सहस्त्रबुद्धे यांचा बंद फ्लॅट फोडला होता. त्यातील एकाला यापुर्वीच पोलीसांनी अटक केली होती. त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. तर मुळ सुत्रधार असलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे.तर त्यांचाच एक सहकारी अद्याप फरार आहे.