रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या राजापूर पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. परदेशवारीसाठी इच्छुकांकडून येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये 23 हजाराहून अधिक लोकांनी पासपोर्ट काढला आहे.
नोकरी, पर्यटन यासह अन्य विविध कामांसाठी कोकणातून परदेशात दरवर्षी अनेकजण ये-जा करत असतात. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट हवाच असतो; मात्र, पूर्वी मुंबई येथे पासपोर्टचे कार्यालय होते. कोकणातील लोकांना पासपोर्ट काढण्यासाठी मुंबई गाठावी लागत होती. त्यामध्ये खर्चासह वेळेचाही अपव्यय होत होता. त्यामुळे कोकणात विशेषतः रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पासपोर्ट कार्यालय व्हावे, अशी मागणी लोकांकडून केली जात होती. त्याची दखल घेऊन कोकणवासियांची परदेशवारी सुरळीत होण्यासाठी आणि पासपोर्ट काढण्याची सुविधा कोकणातील लोकांना स्थानिक पातळीवर मिळावी म्हणून हे कार्यालय उभारण्यात आले.तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हे कार्यालय मंजूर केले होते. हे कार्यालय मुंबई-गोवा महामार्गावर आणि शहरातील पोस्ट कार्यालयामध्ये असल्यामुळे प्रवास करणे दोन्ही जिल्ह्यांमधील लोकांसाठी फायदेशीर ठरत आहे. मुंबई येथे पासपोर्ट काढण्यासाठी होणारा खर्च आणि वेळेची बचत होते. कोरोनानंतर पासपोर्ट काढणार्यांचा वेग कमी झाला होता. पण गेल्यावर्षीपासून पुन्हा अर्ज करणार्यांची संख्या वाढत आहे.
भविष्यात परदेशात जाण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. मागील दोन वर्षात परदेशात जाण्याची संधी नसली तरीही गर्भश्रीमंतांसह काही मध्यमवर्गीयही पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळे कोकणातून पासपोर्ट काढणार्यांची संख्या भविष्यात दुप्पट होण्याची शक्यता आहे.
पासपोर्ट काढण्यासाठी आलेल्यांमध्ये सर्वाधिक कोकणवासीय आखाती देशांमध्ये गेल्याचे दिसते. कोकणातून दुबईला नोकरीसाठी जाणार्या तरुणांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हे कार्यालय त्यांना उपयुक्त ठरते तसेच सिंगापूरला पर्यटनासाठी जाणारेही अधिक आहेत. शिक्षणासाठी बहुसंख्य तरुणांचा कल हा इंग्लंडकडे असल्याचे दिसून आले आहे.