रत्नागिरीत झेंडूच्या फुलांचे दर भिडले गगनाला

रत्नागिरी:- पश्‍चिम महाराष्ट्रातून झेंडूची फुले कमी प्रमाणात आल्यामुळे दर वधारले होते. दरवर्षी गणेशोत्सवात 70 ते 80 रुपये किलोने मिळणारा झेंडू यंदा 400 रुपये किलोने विकला गेला. कोरोनातील टाळेबंदीत वाहतूकीत निर्माण झालेले अडथळे आणि अतिवृष्टीने पश्‍चिम महाराष्ट्रातील झेंडूच्या उत्पादनावरील परिणाम ही प्रमुख कारणे असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे रत्नागिरीत फुला-फुलांची गोष्ट महागाईची अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

भाद्रपदी गणेश चतुर्थीला गणेशोत्सव सुरु होती. गणपती आरासासह हरतालिका, ॠषी पुजन यासाठी विविध प्रकारची फुले, हार यांची मोठ्याप्रमाणात गरज भासते. हारांसाठी सर्वाधिक वापर झेंडु, लिली, निशिगंध या सारख्या फुलांचा होतो. रत्नागिरी झेंडुची लागवड मोठ्याप्रमाणात होत नाही. त्यामुळे बहूतांश हारांचे व्यापारी कोल्हापूरसह मुंबई, पुणे मार्केटमधून फुलांची मागणी करतात. त्यातही कोल्हापूरला सर्वाधिक पसंती आहे. गणेशोत्सवासाठी दोन ते तीन टन झेंडू आणला जातो. सर्वसाधारणपणे झेंडूचा दर 80 ते 100 रुपये किलो इतका असतो. यंदा हे दर गगनाला भिडलेले आहेत. गणेशोत्सवात किलोचा दर 400 रुपयांवर गेलेला होता. कोरोना आणि पावसाने झंेंडूचे दर वधारल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

कोरोनामुळे टाळेबंदी करण्यात आली असून वाहतूकीवर परिणाम होत आहे. परजिल्ह्यातून आलेल्यांना क्वारंटाईन केले जाते. कोल्हापूरमधील झेंडूसह इतर प्रकारची फुले ही एसटी पार्सलद्वारे आणली जातात. खासगी पार्सलद्वारे होत असलेल्या वाहतूकीचे दर कोरोनामुळे वधारलेले आहेत. त्यातच काही दिवसांपुर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतीवर परिणाम झालेला आहे. झेंडूचे यंदा उत्पादनच कमी घेण्यात आले असल्याने फुले कमी प्रमाणात आहेत. व्यापार्‍यांनी आधीच फुले आरक्षित करुन ठेवलेली होती. त्यांना वेळेत उपलब्ध झाली आहेत. ऐन गणेशोत्सवावेळी व्यावसायिकांना फुले आणण्यासाठी आटापिटा करावा लागला. त्यामुळे फुलाचे किलोचे दर वाढवण्यात आले. त्याचा परिणाम फुलांच्या हारांवरही झाला आहे. 10 रुपयांचा हार 40 ते 50 रुपयांनी विकला गेला, तर मोठे हारही 300 रुपयांपर्यंत विकले गेले. त्याचा भुर्दंड निश्‍चितच ग्राहकांनाही बसला होता. दरम्यान, लिलीच्या फुलांची स्थानिक पातळीवरच मोठ्याप्रमाणात लागवड होत असल्यामुळे त्याचा तुटवडा जाणवला नाही. दहा रुपयांनी एक जुडी अशा नियमित दरात ती विकली गेली. लिलीची लागवड करणारे शेतकरी हे ठरलेल्या व्यावसायिकांनाच फुले  विकतात. त्यामुळे अनेकांना कोल्हापूरमधून मागविण्याची वेळ आली होती.